Kolhapur News: एकच नंबर प्लेट लावली दोन दुचाकींना; दुसऱ्या दुचाकीचा अपघात, पहिल्या मालकाची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:02 IST2025-12-09T13:01:42+5:302025-12-09T13:02:00+5:30
असाही संशय

Kolhapur News: एकच नंबर प्लेट लावली दोन दुचाकींना; दुसऱ्या दुचाकीचा अपघात, पहिल्या मालकाची चौकशी
शिवाजी सावंत
गारगोटी: सेनापती कापशी (ता. कागल) येथे एचएसआरपी नंबरप्लेट बनविण्याचा परवाना असलेल्या आणि दुचाकीचा सब-डीलर म्हणून काम करणाऱ्या विक्रेत्याच्या बेफिकीर, बेकायदेशीर कारभाराचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जुन्या दुचाकीसाठी तयार होणारी नंबरप्लेट त्याच विक्रेत्याने नवीन दुचाकीला बसवून ग्राहकांची उघडपणे फसवणूक केली. याच चुकीच्या नंबरप्लेट असलेल्या गाडीचा झालेल्या अपघातात मोलमजुरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून मूळ नंबरधारकाला पोलीस ठाण्यात स्पष्टीकरण द्यावे लागले.
मुरगूड ता.कागल येथील ऋषिकेश बोरगावे यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी जुनी गाडीची (क्र.एमएच १० एएच १०४०) एचएसआरपी नंबरप्लेट बनविण्यासाठी कापशीतील परवानाधारकांकडे अर्ज केला होता. पावतीवर २९ ऑगस्ट ही नंबरप्लेट मिळण्याची तारीख देण्यात आली. २९ तारखेला बोरगावे यांनी संबंधित संस्थेला फोन करून नंबरप्लेट बाबत विचारणा केली. मात्र त्यांनी चार दिवसांनी मिळेल असे सांगितले.
दरम्यान देवर हिप्परगी, ता.सिंदगी, जि.विजापूर येथील तरुण मिथुन पंडित डालेर (वय २९) हा मोलमजुरीसाठी सध्या कासारी, ता.कागल येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याने कापशी येथील संबंधित एजन्सीकडून नवी दुचाकी खरेदी केली. या गाडीला (एमएच १० एएच १०४०) हा क्रमांक असलेली एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आली. मात्र हा क्रमांक ऋषिकेश बोरगावे यांच्या जुन्या दुचाकीचा होता. याबाबत मिथुन डालेर आणि ऋषिकेश बोरगावे हे दोघेही अनभिज्ञ होते.
या नवीन दुचाकीचा ११ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास गारगोटी–गडहिंग्लज रस्त्यावर पांगिरे (ता. भुदरगड) जवळ चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसून मिथुन डालेर जागीच ठार झाले. अपघातानंतर पोलीसांनी दुचाकी जप्त करून तपास सुरू केला. गाडीवरील क्रमांकावरून मालक म्हणून ऋषिकेश बोरगावे यांचे नाव आढळताच पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांनी पावतीसकट संपूर्ण माहिती दिल्यावर पोलिसही अवाक् झाले.
असाही संशय
या प्रकरणात एका गाडीची नंबरप्लेट दुसऱ्या गाडीला लावण्याचे प्रकार या सब-डीलरकडून मोठ्या प्रमाणात झाले असावेत,असा संशय मृत मिथुनचे वडील पंडित सिद्राम डालेर यांनी व्यक्त केला. या विक्रेत्याशी संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही.