Kolhapur Politics: ‘करवीर’मध्ये महायुती नडली; काँग्रेसची वाढणार डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:45 IST2025-07-17T17:44:31+5:302025-07-17T17:45:03+5:30
शिंदेसेना, भाजपच्या आशा पल्लवित

Kolhapur Politics: ‘करवीर’मध्ये महायुती नडली; काँग्रेसची वाढणार डोकेदुखी
प्रकाश पाटील
कोपार्डे : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची फेररचनेने करवीर तालुक्यात राजकीय पक्षांची गणिते विस्कटणार आहेत. गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेसहपंचायत समितीवरकाँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले. मात्र, फेररचना आणि राजकीय सत्ता पाहिली तर काँग्रेससाठी डोकेदुखी वाढवणारी ठरणार हे मात्र निश्चित आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक जिल्हा परिषद १२ व पंचायत समितीचे २४ सदस्य करवीर तालुक्यात आहेत. फेररचनेमध्ये पाडळी खुर्द हा नवीन मतदारसंघाची निर्मिती झाली असली तरी त्याचे पडसाद इतर मतदारसंघांवर झाले. गावाची मोडतोड केल्याने अनेकांची गणिते बिघडली तर काहींचे गणित सोपे झाले आहे.
मागील निवडणुकीत अकरापैकी ५ जागा जिंकत काँग्रेसने आपला दबदबा कायम राखला होता. शिंगणापूरमधून अपक्ष विजयी झालेल्या रसिका पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने तालुक्यात काँग्रेस भक्कम झाली होती. पंचायत समितीच्या स्थापनेपासून करवीर पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.
फेररचनेत मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची मोडतोड झाली आहे. त्यात, ‘करवीर’ व ‘कोल्हापूर दक्षिण’चे दोन्ही आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे येथे शिंदेसेना व भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘शिये’, ‘वडणगे’ या मतदारसंघावर आमदार चंद्रदीप नरके यांची पकड आहे. ‘शिंगणापूर’ चा निकाल प्रत्येक वेळी धक्कादायक लागला आहे. येथून शिंदेसेना व काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवार कोण? हे जरी महत्त्वाचे असले तरी शिंदेसेना व काँग्रेसमध्ये निकराची झुंज होणार आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनीही शड्डू ठोकल्याने आमदार चंद्रदीप नरके यांच्यासमोर पेच राहणार आहे.
आरक्षणानंतर इच्छुक पत्ते खोलणार
मतदारसंघ निश्चित झाल्यानंतर इच्छुकांनी शड्डू ठोकले असले तरी प्रत्यक्षात आरक्षण काय पडणार यावर गणित राहणार आहे. आरक्षणानंतरच इच्छुक पत्ते खोलणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मागील सभागृहातील बलाबल
- काँग्रेस -५
- भाजप ३
- शिवसेना -२
- अपक्ष- १
पंचायत समितीचे बलाबल
- काँग्रेस -१५
- शिवसेना -४
- भाजप -३
करवीर विधानसभा मतदारसंघ - शिये, वडणगे,शिंगणापूर, सांगरूळ, पाडळी खुर्द, सडोली खालसा,
दक्षिण विधानसभा मतदारसंघ- निगवे खालसा, कळंबे तर्फे ठाणे, पाचगाव, गोकुळ शिरगाव, मुडशिंगी, उचगाव