Kolhapur: सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; फिर्याद देण्यास आलेल्या नातेवाईकांना तीन तास ताटकळत ठेवले, नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:17 IST2025-11-24T16:16:09+5:302025-11-24T16:17:39+5:30
पोलिस निरीक्षकास निलंबित न केल्यास उपोषणाचा इशारा

Kolhapur: सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; फिर्याद देण्यास आलेल्या नातेवाईकांना तीन तास ताटकळत ठेवले, नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
इचलकरंजी : सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाल्यानंतर तक्रार देण्यास आलेल्या नातेवाइकांना शहापूर पोलिस ठाण्यात तीन तास ताटकळत बसवून ठेवल्याबद्दल संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिस उपअधीक्षकांना घेराव घातला.
पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना दोन दिवसांत निलंबित न केल्यास पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आमदार राहुल आवाडे यांनी दिला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित बाबासाहेब आप्पासाहेब बाणदार (वय ५८) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपीने शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी चिमुकलीला घरात बोलावून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित चिमुकलीच्या आईने पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी फिर्याद न घेता आईला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. शनिवारी (दि. २२) रात्री पावणेअकरा वाजता गुन्हा दाखल केला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतप्त महिला व नागरिकांनी थेट पोलिस ठाण्यावर रविवारी मोर्चा काढला.
पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांना पोलिस ठाण्यातच घेराव घातला. आमदार आवाडे यांनी सूर्यवंशी यांच्या कारनाम्याचा पाढा वाचला. पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यात दिरंगाई केली आहे. हा त्यांच्या निष्काळजीपणाचा कळस आहे. त्यांना दोन दिवसांत निलंबित न केल्यास पोलिस ठाण्यासमोर विविध संघटनांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा आवाडे यांनी दिला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्थानिक नागरिकांनीही सूर्यवंशी यांच्या कारनाम्याचा पाढा वाचला.