कोल्हापूरच्या कलासंस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार

By Admin | Updated: December 19, 2014 00:16 IST2014-12-19T00:00:52+5:302014-12-19T00:16:29+5:30

संस्कृती संमेलन : सिद्धगिरी कणेरी मठावर १९ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजन

The reflection of art culture of Kolhapur will emerge | कोल्हापूरच्या कलासंस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार

कोल्हापूरच्या कलासंस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार

कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर व भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील चौथ्या भारतीय संस्कृती संमेलनात कोल्हापूरच्या कलापरंपरेचे आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रांचे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे.
कणेरी मठ येथे १९ ते २५ जानेवारीदरम्यान होत असलेल्या या महोत्सवात कोल्हापूरचे कलावंत कलानगरीच्या अभिजात कलासंस्कृतीच्या आविष्कारातून चित्र-शिल्प, नृत्य-नाट्य, गायन-वादन, आदी लोककलांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होईल, असे भव्य कलादालन उभारणार आहेत.
यातील एक दालन कलानगरीच्या इतिहासास उजाळा देणाऱ्या कोल्हापूर आर्ट स्कूल परंपरेचे असणार आहे. त्यात चित्र-शिल्प परंपरेच्या कलाकारीच्या कलाकृती येथे प्रदर्शित केल्या जाणार आहेत. त्याबरोबर भारताची राजमुद्रा असणारे सिंह स्तंभशीर्ष, देव-देवतांच्या मूर्ती, हस्तकला, पारंपरिक खेळ, लोकजीवन या विषयांची शिल्पे मांडण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील कलामंदिर महाविद्यालयाने ही जबाबदारी उचललेली आहे. या़शिवाय कोल्हापूरची प्राचीन संस्कृती, इतिहास, वस्तुसंग्रहालयाची अंतर्गत प्रतिकृती वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक अमृत पाटील यांच्यावतीने मांडण्यात येणार आहे.
भारतीय चित्रकलेच्या दालनात भारतातील विविध शैलींतील चित्रे, भारतीय चित्रकार, त्यांच्या कलाकृती व परिचय व त्याबरोबर कोल्हापूरचे कलावंत, दुसऱ्या दालनात भारतीय वास्तू / शिल्प यांमध्ये विविध क्षेत्रे व प्रार्थनास्थळे तसेच ऐतिहासिक वास्तू, मूर्ती, लोकजीवन, शेती, उद्योग यांची छायाचित्रे असणार आहेत. तिसऱ्या दालनात साहित्य, त्यामध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, साहित्यिक यांची छायाचित्रे, साहित्यकृती संशोधनाद्वारे चित्रफलकांद्वारे मांडण्यात येतील. चौथे दालन नाट्य, चित्रपटाचे असून त्यामध्ये भारतीय रंगभूमीची माहिती छायाचित्रांसहीत चित्रफलकाद्वारे मांडण्यात येणार आहे.

महोत्सव स्थळाला शाहू महाराजांचे नाव
महोत्सव स्थळाला ‘राजर्षी शाहू छत्रपती नगरी’ असे नाव देण्यात आले असून, प्रवेशद्वारात छत्रपतींनी अस्पृश्यता निवारण्यासाठी उचललेले पाऊल म्हणजे गंगाराम कांबळे यांचे सत्यसुधारक हॉटेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट असा प्रबोधनात्मक विषय शिल्पांकित केला जाणार आहे. आतील कलादालनात राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जीवनातील पंचवीस निवडक प्रसंग निवडून त्यांची चित्रमालिका तयार केली जात असून, तिचे काम स्थानिक चित्रकारांनी सुरू केले आहे.

Web Title: The reflection of art culture of Kolhapur will emerge