रूद्रच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात छापे

By Admin | Updated: September 20, 2015 02:02 IST2015-09-20T02:02:45+5:302015-09-20T02:02:45+5:30

पानसरेंची हत्या : साधकांवरही नजर; छाप्यात ठोस धागेदोरे नाहीत

Raids in the Sangli district raid | रूद्रच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात छापे

रूद्रच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात छापे

सांगली/कोल्हापूर : ज्येष्ठ नेते
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटात पाहिजे असलेल्या काराजनगी (ता. जत) येथील फरारी संशयित रुद्रगौडा पाटील याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याच्यासह काही साधकांच्या शोधासाठी शुक्रवारी पोलिसांनी सांगली, मिरजेसह जत तालुक्यात छापे टाकले. पण हाती काहीच लागले नाही. दरम्यान, संशयित समीर गायकवाडच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर व सांगली पोलीस संयुक्तरीत्या
कॉ. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. साते ते आठ वर्षांपूर्वी गोव्यातील मडगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये सांगलीत पत्रकार म्हणून काम केलेला मलगोंडा पाटील (रा. काराजनगी) हा ठार झाला होता. मलगोंडा हा रुद्रगौडा पाटीलचा चुलत भाऊ आहे. स्फोटानंतर तो फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक (एनआयए) अनेकदा सांगली व जत तालक्यात येऊन गेले आहे.पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. कॉ. पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक केल्यानंतर रुद्रगौडा पाटील पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचाही हत्येमध्ये सहभाग असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी सांगली, मिरज व जत तालुक्यांत छापे टाकले. मृत मलगोंडा पाटील याच्या काराजनगी येथील घरीही पोलीस जाऊन आले असल्याचे समजते. यासंदर्भात पोलिसांकडे विचारणा केली. परंतु, त्यांना हा तपासाचा भाग आहे, आम्हाला काहीच माहिती देता येत नाही, असे सांगून अधिक भाष्य करण्यास टाळले. रुद्रगौडा पाटीलच्या संपर्कात आलेल्या काही साधकांवर पोलिसांची नजर ठेवली आहे. त्यांचाशी शोध सुरू ठेवला आहे. मात्र, समीर गायकवाड अटक झाल्यापासून काही साधक गायब झाले असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Raids in the Sangli district raid