कोल्हापुरातील पाचगावात जुगार अड्ड्यावर छापा; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन माजी नगरसेवकांच्या मुलांसह १३ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:13 IST2025-10-09T18:13:21+5:302025-10-09T18:13:39+5:30
छापा पडताच पळापळ

कोल्हापुरातील पाचगावात जुगार अड्ड्यावर छापा; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन माजी नगरसेवकांच्या मुलांसह १३ जणांवर गुन्हा
कोल्हापूर : पाचगावच्या हद्दीत गिरगाव रोडवर अण्णा पाटील नगर येथे संजय बाबूराव बोटे (वय ४०) याच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून करवीर पोलिसांनी कारवाई केली. मंगळवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत जुगार अड्ड्याच्या मालकासह १० जणांना ताब्यात घेऊन १३ जणांवर गुन्हा दाखल केला. जुगार अड्ड्यावरील सव्वा लाखाची रोकड, मोबाइल, वाहने असा ३३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जुगार खेळणाऱ्यांमध्ये दोन माजी नगरसेवकांच्या मुलांचा समावेश आहे.
पाचगाव येथील अण्णा पाटील नगरमध्ये संजय बोटे याच्या घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा करवीर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत १७ ते १८ जण जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. पोलिसांची चाहूल लागताच यातील पाच ते सहा जण पळून गेले. उर्वरित १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वा लाखाची रोकड, आठ मोबाइल, तीन दुचाकी, दोन चारचाकी वाहने आणि एक रिक्षा असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा चालवणाऱ्यांसह घरमालक आणि जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक नाथा गळवे अधिक तपास करीत आहेत.
यांच्यावर गुन्हे दाखल
घरमालक संजय बोटे याच्यासह जुगार अड्ड्याचा मालक संतोष गायकवाड (रा. जोशीनगर झोपडपट्टी, संभाजीनगर), योगेश मोहन सूर्यवंशी (३५, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) यांच्यासह खेळणारे अरविंद सखाराम कुचेकर (२९, रा. राजेंद्रनगर), अनिकेत बळवंत कदम (३२), प्रकाश विष्णू बुचडे (३२, दोघे रा. यवलुज, ता. पन्हाळा), उत्तम राजेंद्र भोसले (४२, रा. उद्यमनगर), अतिश गोरोबा कांबळे (वय ३०, रा. जोशीनगर झोपडपट्टी), कुणाल रणजीत परमार (३६, रा. गुजरी, कोल्हापूर), सागर खंडू कांबळे (३०, रा. राजेंद्रनगर), सौरभ अशोक पोवार (२०, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर), अमोल बुकशेट (रा. कसबा बावडा), रवी सोनटक्के (रा. राजेंद्रनगर) यांच्यासह अनोळखी तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल केला.
छापा पडताच पळापळ
पोलिसांनी छापा टाकताच अमोल बुकशेट, रवी सोनटक्के यांच्यासह इतर तीन ते चारजण पळून गेले. इतरांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. वाहने पोलिसांच्या हाती लागल्याने काही जणांना पळून जाता आले नाही.