Kolhapur: टँकर-कंटेनरच्या मध्ये कार सापडून पुण्याची महिला जागीच ठार, संकेश्वरनजीक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:03 IST2025-10-29T12:03:11+5:302025-10-29T12:03:36+5:30
बालकासह पाच जण जखमी, कंटेनरचालक ताब्यात

Kolhapur: टँकर-कंटेनरच्या मध्ये कार सापडून पुण्याची महिला जागीच ठार, संकेश्वरनजीक अपघात
संकेश्वर (जि. बेळगाव) : गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटून गावी परतणाऱ्या कारला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील अक्षता दिलीप डहाळे (वय २९, रा. कोथरूड, पुणे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य पाच जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिपूर फाट्यानजीक (ता. हुक्केरी) येथे सोमवार (२७) रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी तामिळनाडूच्या कंटेनरचालकाविरुद्ध संकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातात कारचालक अजय अशोक शेळके (वय २८), सचिन देविदास सासवे (वय २५), स्नेहल अर्जुन खेतारी (वय १७) योगिता योगेश निंबाळे (वय ३५) व यश (वय ८, रा. सर्व जण पुणे) हे जखमी झाले आहेत. अपघातातील मृत अक्षता यांचे कोथरूड-पुणे येथे ब्युटी पार्लर आहे.
डहाळे कुटुंबीय हे शुक्रवार (२४) पर्यटनासाठी कारमधून (क्रमांक एमएच-१२, व्हीटी-८२१३) कोथरूडहून गोव्याला गेले होते. सोमवारी (२७) गोव्याहून पुन्हा ते पुण्याकडे शिप्पूर मार्गे परत जात होते. दरम्यान, शिपूर फाट्यानजीक कार आली असता कारच्या पुढे जाणाऱ्या दुधाच्या टँकरने स्पीड ब्रेकरमुळे अचानक वेग कमी केला. त्यामुळे कारचालकानेही वेग कमी केला.
मात्र, कारच्या पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने कारला जोराची धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहनांच्या मध्ये कार चिरडली गेल्याने कारमधील अक्षता यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य ५ जण जखमी झाले.