पूजा पवारचे पालकत्व काडसिद्धेश्वर स्वामींकडे

By Admin | Updated: July 3, 2015 01:05 IST2015-07-03T01:05:31+5:302015-07-03T01:05:31+5:30

शोभेच्या दारूच्या स्फोटातील जखमी : सातारा जिल्ह्यातील मुलगी, वैद्यकीय खर्चासह शिक्षणाचीही जबाबदारी

Puja Pawar's guardianship Kadasiddheshwar Swamikande | पूजा पवारचे पालकत्व काडसिद्धेश्वर स्वामींकडे

पूजा पवारचे पालकत्व काडसिद्धेश्वर स्वामींकडे

कोल्हापूर : शोभेच्या दारूच्या स्फोटात जखमी झालेल्या वाई (जि. सातारा) तालुक्यातील ओझर्डे येथील पूजा पवार या मुलीचे पालकत्व येथील कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजींनी स्वीकारले आहे. तिचा पुढील वैद्यकीय खर्च, शिक्षण, नोकरी, लग्न यांची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजींनीच पत्रकारांशी बोलताना गुरुवारी ही माहिती दिली.
ओझर्डे येथे ८ एप्रिलला झालेल्या पद्मावती देवीच्या यात्रेच्यावेळी शोभेच्या दारूच्या आतषबाजी वेळी मोठा स्फोट झाला. यात्रेतील अनेक खेळण्याची दुकाने आगीच्या भस्मसात पडली. त्यावेळी खेळण्याच्या दुकानात झोपलेल्या अकरा आणि दहा वर्षांच्या पूजा आणि गीता आगीत गंभीर जखमी झाल्या. लोकांनी त्या मुलींना उपचारासाठी साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल ; पण त्यांच्यावर उपचार करण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
त्यांना पुणे येथे खासगी रुग्णालयात हलविण्यास सांगितले. वडील रामदास पवार यांची आर्थिक कुवत नाही. खेळणी विकून ते कुटुंब चालवतात. दोनवेळचं पोट भरण्यासाठीच त्यांचा संघर्ष सुरू असतो. परिणामी जखमी मुलींवर उपचाराला पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. कोल्हापूरचे मात्र वाईत प्रांताधिकारी असलेले रवींद्र खेबुडकर यांनी माहिती काडसिध्देश्वर स्वामींना सांगितली.
स्वामींनी त्वरित दोन्ही मुलींना उपचारासाठी सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये आणले. उपचार सुरू असताना गीताचा मृत्यू झाला. पूजा मात्र उपचारास चांगली प्रतिसाद देत राहिली. डॉ. रणजित मिरजे, डॉ. सुधाकर लिमये, डॉ. अमोल मोहिते यांनी विशेष लक्ष देऊन तिच्यावर उपचार केले. तिची प्रकृती चांगली झाली आहे. आतापर्यंतची सर्व सेवा मोफत दिली आहे. या पुढीलही वैद्यकीय खर्च, शिक्षण, नोकरी, लग्न करण्याचे पालकत्व काडसिध्देश्वर स्वामींनी घेतले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Puja Pawar's guardianship Kadasiddheshwar Swamikande