कुरुंदवाड : येथील रखडलेल्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत शिवसेनेने आत्मदहनाचा इशारा दिल्याने पालिका सभागृहात दुपारी पालिका प्रशासनाने आंदोलकांची बैठक घेतली. मात्र, या निर्णयाबाबत आयुक्तांचे लेखी पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतल्याने बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली असून पाणीपुरवठा विषय पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.
शहराची सुधारित नळ पाणीपुरवठा रखडली आहे. योजना पूर्ण करण्यात ठेकेदार, पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने योजना राज्य शासनाकडे वर्ग करून शासनानेच योजना पूर्ण करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजू आवळे यांच्यासह पदाधिकारी यांनी निवेदन देत प्रसंगी प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन मागे घ्यावे, यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आंदोलकांना लेखी पत्रातून विनंती केली आहे. यावर चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी दालनात आंदोलक व लोकप्रतिनिधींची मंगळवारी दुपारी बैठक झाली. मात्र, पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर अविश्वास दाखवत आयुक्तांचे याबाबत लेखी पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा विचार करणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केल्याने बैठक निष्फळ ठरली.
बैठकीला नगराध्यक्ष जयराम पाटील, मुख्याधिकारी जाधव, पाणीपुरवठा सभापती फारुख जमादार यांच्यासह आप्पासो भोसले, रामभाऊ माळी, सुहास पासोबा, राजू बेले, वैशाली जुगळे, आप्पा गावडे उपस्थित होते.