लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे यंदा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत हे मानकरी ठरले. आज, मंगळवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे पदक जाहीर झाल्यामुळे जिल्हा पोलीस दलात आनंद व्यक्त होत आहे.
पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) व स्वातंत्र्य दिनाच्या (१५ ऑगस्ट) पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले जाते.
तानाजी सावंत हे मूळचे सिकंदर टाकळी (ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर)चे १९९४-९५ मध्ये सरळ सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते भरती झाले. त्यांनी २५ वर्षांच्या सेवेत नाशिक, मुंबई, जळगाव, पुणे, कोल्हापूर येथे विविध पदांवर काम केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी दाभोलकर खुनाच्या तपासादरम्यान करण्यात आलेल्या पॅचेटच्या एस.आयटीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. याशिवाय ३ जानेवारी २०१८ मध्ये भीमा-कोरेगावच्या प्रसंगावरून अनपेक्षितपणे कोल्हापुरात उसळलेल्या दंगल यशस्वीपणे हाताळली. सर्वांसोबत सलोखा राखत दोन्ही समाजामध्ये शांतता प्रस्तापित केली. जिल्ह्यात दोन वेळा गोळीबार करीत आरोपींना जेरबंद केले. राजस्थानमध्ये धुमाकूळ घालून दहशत माजविणाऱ्या ०७ बिष्णोई गँगमधील कुख्यात शामलाल पुनियाबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर झालेल्या समोरासमोरील गोळीबारात स्वत:चा जीव धोक्यात घालून सहकाऱ्यांचा जीव वाचविताना रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. त्यात शामलाल जखमी झाला. यात त्याला हत्यारांसह जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. बत्तीसहून अधिक गुंडांवर मोक्कांतर्गत कारवाईत सहभाग घेतला. नाशिक, कोल्हापूरमध्ये गंभीर गुन्ह्यात कोट्यावधी रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला. अशा एक ना अनेक जिगरबाज कारवाईत बजावलेल्या कामगिरीबद्दल त्या त्या वेळी वरिष्ठांनी सुमारे ३०० हून अधिक बक्षिसेही त्यांना दिली. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, गृहमंत्री आर.आर. पाटील, पोलीस महासंचालक शिवानंद, सुब्रमण्यम, संजय दयाळ, सुबोध जयस्वाल यांनी गौरविले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, शाहू छत्रपती यांनीही पाठीवर कौतुकाची थाप देत गौरविले आहे. आई शकुंतला, वडील दिगंबर, पत्नी ललिता, मुली आराधना, हरिप्रिया यांचा पाठिंबा आणि माझ्या सहकाऱ्यांमुळेच हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे.
फोटो : २५०१२०२१-कोल-तानाजी सावंत