Kolhapur: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पूर्वतयारी करा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:49 IST2026-01-12T11:48:18+5:302026-01-12T11:49:16+5:30
राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित घ्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Kolhapur: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पूर्वतयारी करा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने रविवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. एकीकडे हे पूर्वतयारीचे आदेश असताना दुसरीकडे राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित घ्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, यावर आज, सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत पावसाळ्यानंतर चर्चा सुरू होत्या. यानंतर प्रभाग रचना आणि आरक्षणही जाहीर झाले. परंतु काही जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. एकीकडे ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना हे शक्य नसल्याचे वास्तव आहे. अशातच ज्या जिल्हा परिषदांनी ५० टक्क्यांच्या आत आरक्षण ठेवले आहे, अशा १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली आहे.
याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाने रविवारी सुटीच्या दिवशीही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढून निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत. बंदोबस्तापासून ते अधिकारी, कर्मचारी नियुक्तीपर्यंत सविस्तर असा हा आदेश असून, निवडणूक आयोगाने ही तयारी केल्याचे दिसून येते. मात्र, सोमवारी दिल्लीत होणाऱ्या सुनावणीवरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वेळापत्रक अवलंबून आहे.