मुस्लिम बांधवांकडून रावणेश्वराची पूजा

By Admin | Updated: August 31, 2015 23:34 IST2015-08-31T23:34:51+5:302015-08-31T23:34:51+5:30

श्रावणातला तिसरा सोमवार : शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती

Pooja of Ravneeshwar from Muslim brothers | मुस्लिम बांधवांकडून रावणेश्वराची पूजा

मुस्लिम बांधवांकडून रावणेश्वराची पूजा


कोल्हापूर : प्रत्येक धर्म, त्यांच्या चालीरिती वेगळ््या असल्या तरी माणसांच्या ठायी असलेली श्रद्धा आणि भक्ती त्या एकाच ईश्वरीय शक्तीला समर्पित असते. या भक्तीचे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी मुस्लिम बांधवांनी रावणेश्वराला रूद्राभिषेक केला.
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान शंकराच्या आराधनेच्या या महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व असते. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमला लागून असलेल्या रावणेश्वर मंदिराला मोठा धार्मिक इतिहास आहे. सोमवारी मुस्लिमबांधव रमजान हकिम, सलमा नायकवडी, चाँदसाो हकिम, जहाँगीर पटेल यांनी रावणेश्वराला रूद्राभिषेक केला व बेल वाहिला. त्यानंतर देवाची आरती करण्यात आली. गुरुजी अशोक भोरे यांनी पौरोहित्य केले. दुपारी ओंकार स्वाध्याय मंडळाच्यावतीने रूद्र पठण व स्तोत्र गायन झाले. त्यानंतर सुलभा देशपांडे यांचे गायन, चंचल देशपांडे यांचा भक्तिगीतांचा व रात्री राजू मिस्त्री यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरात तिसऱ्या सोमवारी महादेवाच्या पिंडीस भाताचे लिंपण करण्यात आले. मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात पहाटे महाअभिषेक करण्यात आला. दुपारी सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसादाचे वाटप झाले. संध्याकाळी निरूपमा महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

अंबाबाईची शंकर आराधना
तिसऱ्या सोमवारनिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची महादेवाच्या पिंडीचे पूजन करत असलेल्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. श्रावणानिमित्त अंबाबाई मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेले मातृलिंग मंदिरही दिवसभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

Web Title: Pooja of Ravneeshwar from Muslim brothers