कोल्हापुरातील पंचगंगेचे प्रदूषण कमी, साधारण प्रदूषित यादीत समावेश; राज्यातील ५४ नद्या दूषित
By संदीप आडनाईक | Updated: October 10, 2025 12:17 IST2025-10-10T12:17:07+5:302025-10-10T12:17:29+5:30
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल जाहीर

कोल्हापुरातील पंचगंगेचे प्रदूषण कमी, साधारण प्रदूषित यादीत समावेश; राज्यातील ५४ नद्या दूषित
संदीप आडनाईक
कोल्हापूर : राज्यातील ५४ नद्या प्रदूषित असल्याचा अहवाल सप्टेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नद्यांच्या स्वच्छतेबाबतच्या या अहवालानुसार नीरा मध्यम प्रदूषित, काेयना, कृष्णा, वेण्णा सर्वसाधारण प्रदूषित, तर उरमोडी आणि पंचगंगा साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक नद्यांचा या यादीत समावेश आहे.
देशभरातील नद्यांतील प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ 'नॅशनल वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग प्रोगाम' राबवत असते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण किती आहे? यावर पाण्याचे प्रदूषण ठरवले जाते. यासाठी मंडळाकडून नद्यांतील पाण्याचे नमुने गोळा करत प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर नद्यांचा प्रदूषित पट्टा ठरवला जातो.
असे मोजतात प्रदूषण?
नद्यांतील पाण्यांचे नमुने गोळा केले जातात. त्यात फिजिओ केमिकल, बॅक्टेरिओलॉजिकल, मेटल्स आणि पेस्टीसाइड्सच्या मापदंडाच्या आधारे प्रदूषण ठरवले जाते. पाण्यातील प्राणवायूचे आवश्यक प्रमाण गृहित धरले जाते. त्यानुसार नद्यांची श्रेणीनिहाय वर्गवारी केली जाते. सर्वाधिक प्रदूषित नद्यांना उपाययोजनेनुसार प्राधान्यक्रम दिला जातो. धोकादायक प्रदूषित, अत्याधिक प्रदूषित, मध्यम प्रदूषित, सर्वसाधारण प्रदूषित आणि साधारण प्रदूषित असे पाच प्राधान्यक्रम आहेत.
कृष्णा, पंचगंगा प्रदूषित
या अहवालात कुरुंदवाड येथे गणपती घाटावर कृष्णा ही सर्वसाधारण प्रदूषित आणि इचलकरंजी परिसरातील शिरदवाड येथे एमआयडीसीत इनटेक वेल येथील पंचगंगा नदीत सांडपाणी थेट मिसळत असल्यामुळे ही जागा साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत.
- मध्यम प्रदूषित : सातारा जिल्ह्यातील सारोळे गावाजवळील सांगवी येथे नीरा नदी
- सर्वसाधारण प्रदूषित : कऱ्हाड येथे कोयना, सातारा ते कुरुंदवाड मार्गावरील गणपती घाट येथी कृष्णा, महाबळेश्वर ते माहुली मार्गावर कृष्णा
- साधारण प्रदूषित : इचलकरंजी परिसरातील शिरदवाडजवळ एमआयडीसी इनटेक वेल येथे पंचगंगा, सातारा ते नागठाणे केटीवेअर येथे उरमोडी आणि पोफळीजवळ वशिष्ठी.
मुळात नद्या प्रदूषित होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे. त्या प्रदूषित झाल्याच तर त्या प्रवाहित ठेवल्या गेल्या पाहिजेत, त्याउलट त्या अडवल्या जात आहेत. त्यामुळे प्रदूषित घटक तिथेच अडकतात. त्यामुळेच नद्या प्रदूषण वाढत आहे. शासन, प्रशासनासोबत नागरिकांनी याकडे लक्ष दिले नाही तर पाणी पिण्यायोग्य मिळणार नाही. - डॉ. अनिलराज जगदाळे, जलस्रोत अभ्यासक.
२०१२ मध्ये इचलकरंजीतील प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार २०१५ ते २०२५ पर्यंत कृती कार्यक्रम राबविण्यात आल्याने पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता कमी झाली आहे. - उदय गायकवाड, सदस्य, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ