कुस्तीतील राजकारणामुळे मल्लांचे नुकसान : शाहू छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:51 IST2025-02-10T11:50:40+5:302025-02-10T11:51:51+5:30

कोल्हापुरात महाराष्ट्र केसरीचे नियोजन करू

Politics in wrestling is causing losses to wrestlers says Shahu Chhatrapati | कुस्तीतील राजकारणामुळे मल्लांचे नुकसान : शाहू छत्रपती

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : ‘सध्या कुस्तीच्या क्षेत्रात राजकारण घुसले असून या राजकारणाच्या डावपेचामुळे मल्लांचे मोठे नुकसान होत आहे. कुस्तीतून राजकारण हद्दपार करण्यासाठी सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा कोल्हापुरात भरविण्याचे नियोजन करून कोल्हापूरची कुस्ती परपंरा जपूया,’असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे चीफ पेट्रन आणि वस्ताद बाळ ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण आणि मल्लांसाठीच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन असा संयुक्त सोहळा शाहू छत्रपती यांच्या हस्ते रविवारी मिरजकर तिकटी येथील मोतीबाग तालमीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

शाहू छत्रपती म्हणाले, कुस्ती क्षेत्रातील राजकारण बाजूला करण्यासाठी सर्वांनीच एकत्र आले पाहिजेत. केंद्र आणि राज्य सरकारने मल्लांना चांगले पाठबळ दिले पाहिजे. महागाईच्या काळात मल्लांना खर्च परवडत नाही. सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका पैलवान योजना राबवून मानधन दिले पाहिजे.

माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, खेळात राजकारण घुसले आहे. खासदार शाहू छत्रपती यांनी पुढाकार घेऊन शुद्धिकरण करावे. कोल्हापुरातून हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी होण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.

राष्ट्रीय तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी तालीम संघाची माहिती सांगून कुस्ती क्षेत्रातील आढावा घेतला. यावेळी युवा शिल्पकार ओंकार कोळेकर, आर्किटेक्ट गजानन गरुड, ठेकेदार अजिंक्य पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या २० हून अधिक जणांचा सत्कार झाला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, तालीम संघाचे उपाध्यक्ष पी. जी. मेढे, बाळ पाटणकर, प्रदीप गायकवाड, पैलवान संभाजी वरुटे, प्रकाश खोत, गजानन गरड, संभाजी पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, जयकुमार शिंदे उपस्थित होते. अशोक पोवार यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष आणि हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी आभार मानले.

‘मोतीबाग’साठी २० लाखाचा निधी

तालमीसाठी लागणारा उर्वरित वीस लाखांचा निधी जाहीर करत राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शाहूपूरी, गंगावेश तालमीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी दिला. कोल्हापुरात चांगले मल्ल तयार करण्यासाठी लागेल ती मदत केली जाईल. महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापुरात भरविण्यासाठी सरकारतर्फे लागणारे सर्व सहकार्य केले जाईल. बाळ ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या स्मरणार्थ कुस्ती स्पर्धेचे नियोजन करा.

दुफळी संपवा

राज्यातील कुस्ती क्षेत्रात कुस्ती महासंघ आणि कुस्तीगीर परिषद अशा दोन स्वतंत्र संघटना झाल्या आहेत. या दोन्ही संघात दुफळी माजली आहे. या दोन्ही संघांनी एकत्र आल्यास कुस्ती क्षेत्राचा झपाट्याने विकास होईल, असे संघाचे जनरल सेक्रेटरी ॲड. महादेवराव आडगुळे यांनी सांगितले.

Web Title: Politics in wrestling is causing losses to wrestlers says Shahu Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.