म्हसवड पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात उपोषण आंदोलन, साताऱ्यातील आंदोलकांना पोलिसांनी उचलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:39 IST2026-03-24T16:38:24+5:302026-03-24T16:39:22+5:30
कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी म्हसवड (जि. सातारा) येथे पोलिसांनी एका गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलासह इतर संशयितांची बाजारपेठेतून ...

म्हसवड पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात उपोषण आंदोलन, साताऱ्यातील आंदोलकांना पोलिसांनी उचलले
कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी म्हसवड (जि. सातारा) येथे पोलिसांनी एका गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलासह इतर संशयितांची बाजारपेठेतून धिंड काढली होती. खोटा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाचा छळ केल्याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. २३) कोल्हापुरात विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परवानगी नसल्याचे कारण पुढे करून शाहूपुरी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
आक्षेपार्ह रिल्सप्रकरणी म्हसवड पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाची बाजारपेठेतून धिंड काढल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते महेश मारुती करचे (रा. जांभुळणी, ता. माण), भागवत अर्जुन जानकर (रा. पळसवडे, ता. माण), प्रसाद ओंबासे यांच्यासह इतरांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची भेट घेऊन निवेदने दिली. लाक्षणिक उपोषण केले तरीही म्हसवड पोलिसांची चौकशी झाली नाही.
यामुळे संबंधित पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी करचे, जानकर आणि ओंबासे यांनी सोमवारी कोल्हापुरात विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले. मात्र, परवानगी घेतली नसल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.