Kolhapur: बहाद्दरांनी ट्रकच चोरला; सांगलीत भंगारात विकायला गेले अन् सापडले, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:19 IST2025-09-24T18:18:27+5:302025-09-24T18:19:36+5:30
ट्रक मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू

Kolhapur: बहाद्दरांनी ट्रकच चोरला; सांगलीत भंगारात विकायला गेले अन् सापडले, दोघांना अटक
कोल्हापूर : राजर्षी शाहू मार्केट यार्डपासून चोरलेला ट्रक सांगली येथे भंगारात विकायला गेलेल्या दोन चोरट्यांना शाहुपुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. २३) अटक केली. सतीश श्रीपती चिखलकर (वय ३९) आणि सयाजी दिनकर चिखलकर (३२, दोघे रा.चिखलकरवाडी, ता.पन्हाळा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. हे दोघेही ट्रक चालक आहेत. मंगळवारी (दि. १६) पहाटे त्यांनी ट्रकची चोरी केली होती.
शाहू मार्केट यार्डजवळ पार्क केलेला ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद पर्वतसिंग इंदरसिंग भाटी (४६, सध्या रा.साखळी, गोवा, मूळ रा.जोधपूर, राजस्थान) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून शोध घेतला असता, चोरलेला ट्रक सांगली येथे एका भंगारवाल्याकडे गेल्याचे समजले. कागदपत्र नसल्याने भंगारवाल्याने ट्रक घेतला नाही.
मात्र, तिथे ट्रक घेऊन गेलेल्या व्यक्तीचा मोबाइल नंबर पोलिसांना मिळाला. त्यावरून चोरट्यांचे लोकेशन काढून मार्केट यार्डमधून सतीश चिखलकर आणि सयाजी चिखलकर या दोघांना पोलिसांनी अटक केली. अधिक चौकशीत त्यांनी चोरीतील ट्रक राजाराम तलाव येथे लावल्याचे सांगितले. पोलिसांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, महेश पाटील, सुशीलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, कृष्णात पाटील, मंजर लाटकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला.
ट्रक मालकाच्या डोळ्यात पाणी
माल वाहतुकीच्या कामासाठी कोल्हापुरात आल्यानंतर पर्वतसिंग भाटी यांनी त्यांचा ट्रक मार्केट यार्डजवळ लावला होता. रात्रीत चोरट्यांनी त्यांचे उपजीविकेचे साधनच लंपास केले होते. त्यामुळे भाटी अस्वस्थ होते. सात दिवसांत पोलिसांनी ट्रकचा शोध घेतला. लवकरच न्यायालयाच्या आदेशाने ट्रक भाटी यांना परत दिला जाणार आहे. ट्रक सापडल्याने भाटी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दोन्ही हात जोडून त्यांनी पोलिसांचे आभार मानले.