Kolhapur Crime: अवैध पिस्तूल विक्रीसाठी आले; पोलिसांच्या जाळ्यात सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:24 IST2026-01-28T18:24:19+5:302026-01-28T18:24:35+5:30
बिहारी कामगाराकडून घेतल्याची कबुली

Kolhapur Crime: अवैध पिस्तूल विक्रीसाठी आले; पोलिसांच्या जाळ्यात सापडले
कोल्हापूर : तस्करीतील गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेला अजिंक्य जयसिंग भोसले (वय २८, सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मूळ रा. म्हसवे, ता. भुदरगड) याला जुना राजवाडा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे विक्रीसाठी अवैध पिस्तूल देणारा छन्नुसिंह उर्फ चिन्मय विलास सरनोबत (३४, सध्या रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ रा. तिरपण, ता. पन्हाळा) यालाही अटक केली.
त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, १४ जिवंत राउंड, दोन मॅगजिन, दोन दुचाकी आणि मोबाइल असा सुमारे पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांंनी जप्त केला. रामानंदनगर ते संभाजीनगर रोडवर मैलखड्डा येथे रविवारी (दि. २५) सायंकाळी साध्या वेशात सापळा रचून ही कारवाई केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार सागर डोंगरे यांना अवैध पिस्तुलाच्या विक्रीची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी रामानंदनगर ते संभाजीनगर रोडवर मैलखड्डा येथे सापळा रचला.
पिस्तूल विक्रीसाठी दुचाकीवरून आलेला संशयित अजिंक्य भोसले याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळाले. अधिक चौकशीत त्याने हे पिस्तूल छन्नुसिंह सरनोबत याच्याकडून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने सरनोबत याला त्याच्या घरातून अटक केली. दोघांकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल, १४ जिवंत राउंड, दोन रिकामे मॅगजिन, दोन दुचाकी आणि मोबाइल असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
बिहारी कामगाराकडून घेतल्याची कबुली
एका बिहारी कामगाराकडून पिस्तूल घेतल्याची कबुली अटकेतील छन्नुसिंह याने पोलिसांकडे दिली आहे. याची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ते कोणाला विकले जाणार होते, याचाही तपास सुरू आहे. यातून गावठी पिस्तुलांच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.