Kolhapur: एएस ट्रेडर्समधील गोल्डन मॅन एजंट संदीप वाईगडेला बेड्या, २७ कोटींची मालमत्ता जप्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:41 IST2025-07-11T16:39:28+5:302025-07-11T16:41:24+5:30

दोन वर्षे होता पसार : मुख्य सूत्रधार लोहितसिंगच्या दागिन्यांवर केला रुबाब

Police arrest Sandeep Laxman Waigadde a Golden Man agent of AS Traders for defrauding investors | Kolhapur: एएस ट्रेडर्समधील गोल्डन मॅन एजंट संदीप वाईगडेला बेड्या, २७ कोटींची मालमत्ता जप्त होणार

Kolhapur: एएस ट्रेडर्समधील गोल्डन मॅन एजंट संदीप वाईगडेला बेड्या, २७ कोटींची मालमत्ता जप्त होणार

कोल्हापूर : गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सोन्याचे दागिने घालून मिरवणारा एएस ट्रेडर्सचा गोल्डन मॅन एजंट संदीप लक्ष्मण वाईगडे (वय ३९, रा. पाटील गल्ली, उचगाव) हा अखेर दोन वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या असून, त्याची १० लाखांची कार जप्त केली. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्याकडून मिळालेले दागिने वाईगडे याने बँकेत तारण ठेवले असून, ते मिळविण्यासाठी पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार केला आहे.

तपास अधिकारी रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील संदीप वाईगडे हा एएस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याचा विश्वासू होता. वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या संदीपने सुरुवातीला ‘एएस’मध्ये थोडी रक्कम गुंतवली होती. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळत असल्याचे भासविण्यासाठी सुभेदार याने त्याला स्वत:कडील १५ तोळे दागिने दिले.

कंपनीचा एजंट करून त्याला सेमिनारमध्ये उभे केले. गुंतवणूकदारांच्या कमिशनमधून मिळालेल्या पैशातून त्याने एक कार खरेदी केली होती. सुभेदार याने दिलेले १५ तोळे दागिने त्याच्याकडे होते. गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली. मात्र, अटक टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तो पसार होता. घराकडे येताच त्याला पोलिसांनी अटक केली.

२७ कोटींची मालमत्ता जप्त होणार

पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह १९ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आजवर त्यांची १९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. याची लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय आणखी आठ कोटींच्या मालमत्तांची माहिती घेऊन त्यावरील जप्ती आणि लिलाव प्रक्रियेसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Police arrest Sandeep Laxman Waigadde a Golden Man agent of AS Traders for defrauding investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.