लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवार (दि. २७) पासून भरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५०३६ शिक्षकांची ‘कोरोना टेस्ट (चाचणी)’ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून यचे नियोजन सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दि. २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झाले. त्या वर्गांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती सध्या वाढली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या इयत्तांचे वर्ग बुधवारपासून सुरू होणार आहेत. मात्र, या शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. कोल्हापूरमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित आदी एकूण १५७८ शाळा आहेत. त्यामधील शिक्षकांची एकूण संख्या १४७१५ आहे. त्यातील माध्यमिक विभागामधील ९६७९ शिक्षकांची कोरोना टेस्ट नोव्हेंबरमध्ये झाली आहे. त्यामुळे उर्वरित ५०३६ शिक्षकांची कोरोना टेस्ट आता असून, त्यामध्ये प्राथमिक विभागातील४५०० शिक्षकांचा समावेश आहे. माध्यमिक शाळांमधील ५४७३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट आतापर्यंत पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल त्यांनी शिक्षण विभागाला सादर केला आहे.
चौकट
कोरोना टेस्ट करण्याची तयारी काय?
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होण्यापूर्वी संबंधित शाळांमधील किमान एका शिक्षकाची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. तालुकापातळीवर कोविड सेंटरमध्ये टेस्ट करण्यात येईल. त्याची जबाबदारी गटशिक्षण अधिकाऱ्यांवर राहणार आहे. टेस्ट शुक्रवार (दि.२२)पासून सुरू होईल.
प्रतिक्रिया
शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येतील. शिक्षकांची कोरोना टेस्ट करून घेण्याचे नियोजन सध्या करण्यात येत आहे.
-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
आकडेवारी दृष्टिक्षेपात
विद्यार्थी संख्या
पाचवी : ५७८४१
सहावी : ५७३९५
सातवी : ५८३२०
आठवी : ५८८००
पाचवी ते आठवीच्या शाळा
जिल्हा परिषद : ११३०
महापालिका : ५१
नगरपालिका : ६५
शासकीय अनुदानित : ७३
अंशत: अनुदानित : ४
स्वयंअर्थसाहाय्यित :१९५
विनाअनुदानित : २३
समाज कल्याण (अनुदानित) : २८
समाज कल्याण (विनाअनुदानित) : ७
तालुकानिहाय शिक्षकांची संख्या
आजरा : ५०३
भुदरगड : ६२२
चंदगड :७९३
गडहिंग्लज : ९८८
गगनबावडा :१४५
हातकणंगले : २७६६
कागल : १०७७
करवीर : १८७८
पन्हाळा : १०८२
राधानगरी : ७८०
शाहूवाडी : ७७९
शिरोळ :१४५८
शहर महापालिका : १८४४