एसआरटी पद्धतीने फुलविली भातशेती

By Admin | Updated: September 6, 2015 22:46 IST2015-09-06T22:46:37+5:302015-09-06T22:46:37+5:30

नवीन तंत्रज्ञानाने चिपळूण तालुक्यातील कळवंडे येथील अनंत कांबळी यांनी भातशेती केली आहे.

Paddy cultivation by SRT method | एसआरटी पद्धतीने फुलविली भातशेती

एसआरटी पद्धतीने फुलविली भातशेती


उत्तमकुमार जाधव-चिपळूण
कोकणात भातशेतीवरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो. शेतीमध्ये सध्या आधुनिक तंत्रप्रणाली विकसित झाली आहे. चिपळूण तालुक्यातील कळवंडे येथील आंबा बागायतदार व प्रगतशील शेतकरी अनंत बाबाजी कांबळी यांनी एसआरटी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन एक एकर क्षेत्रामध्ये भातशेती फुलविली आहे.
सध्या भातशेतीवर बदलत्या हवामानाचा परिणाम होऊ लागला आहे. शेतीच्या मशागतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. परंतु, पारंपरिक शेती जिवंत राहिली पाहिजे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आजही शेतीसाठी काबाडकष्ट करीत आहे. चिपळूण तालुक्यातील पाचाड येथील प्रगतशील शेतकरी अनंत कांबळी यांनी आंबा, काजू तसेच भातशेतीत आधुनिक पद्धतीचा उपयोग करुन एक एकर जमिनीमध्ये भात लागवड केली आहे. सगुणा राईस यंत्र हे भातशेतीशी संबंधित उकळणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरुपी गादी वाफ्यावर (पुढील १० वर्षे उकळणी, चिखल न करता) टोकणणी करुन भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे. या पिकावर रब्बी हंगामातील अन्य पिकेही घेता येऊ शकतात.
पावसाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले तरी भाताचे उत्पन्न पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त येते. पावसाचे प्रमाण चालू हंगामात निम्म्यापेक्षा कमी असूनही कांबळी यांनी या पद्धतीचा उपयोग करुन उत्तम प्रकारे भातशेती फुलवली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना भातलावणी योग्य पध्दतीने करता आली नाही. जी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, अशी शेती शेतकऱ्यांनी न लावता ओसाड सोडली आहे. काही शेतकऱ्यांनी पंपाच्या सहाय्याने भातलावणी केली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भविष्यात भातपिकासाठी एसआरटी या पद्धतीचा उपयोग करुन कमी प्रमाणात झालेली भातशेती या नवीन पद्धतीमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. या नवीन तंत्रज्ञानाच्या भातशेतीची पाहणी कर्जत (जि. रायगड) येथील कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी केली आहे.
कृषीवसंत शेतकरी संघाचे सहकार्य तसेच चिपळूणचे उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. सरतापे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, मार्गताम्हाणेचे मंडल कृषी अधिकारी ए. बी. पाटील, कृषी पर्यवेक्षक ए. एस. मिरगावकर, कृषी सहाय्यक एस. एन. धायगुडे, कृषी सहाय्यक मनोज गांधी आदींच्या मार्गदर्शनाखाली कांबळी यांनी एसआरटी पद्धतीचा प्रयोग केला आहे.
 

Web Title: Paddy cultivation by SRT method