तीन महिन्यांत दुप्पट परताव्याचे आमिष, पुण्यातील कबाना कॅपिटलकडून सव्वा कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:27 IST2022-12-15T13:20:15+5:302022-12-15T13:27:21+5:30
कबाना कॅपिटल नावाची कंपनी असून, या कंपनीमार्फत शेअर बाजारात पैसे गुंतवले जातात

तीन महिन्यांत दुप्पट परताव्याचे आमिष, पुण्यातील कबाना कॅपिटलकडून सव्वा कोटींचा गंडा
कोल्हापूर : तीन महिन्यात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील कबाना कॅपिटल्स कंपनीने कोल्हापुरातील गुंतवणूकदारांची १ कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत उदय राजाराम शिंदे (वय ३६, रा. सरगम विहार, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, तीन संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विवेक अरोरा (रा. भावनगर, गुजरात), अनुप जरगनगर उपाध्याय (रा. उत्तमनगर, ता. हवेली, जि. पुणे) आणि गोविंद विश्वनाथ मुळे (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघांची पुण्यात कबाना कॅपिटल नावाची कंपनी असून, या कंपनीमार्फत शेअर बाजारात पैसे गुंतवले जातात. तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादी उदय शिंदे यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला चांगला परतावा मिळाल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या काही मित्रांनाही कबाना कॅपिटलमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.
जून २०२२ मध्ये अचानक कंपनीने शिंदे यांच्या खात्यातील रक्कम इतरत्र वळविली. याबाबत विचारणा केली असता कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार विचारणा केल्यानंतरही गुंतवलेली मूळ रक्कम आणि परतावे मिळत नसल्याने अखेर शिंदे यांनी ३० नोव्हेंबरला शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.