कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला मंगळवारी कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाईची श्री बगला माता रूपात पूजा बांधण्यात आली. अमृत समुद्रामधील मणिमंडपाच्या रत्नखचित वेदावरील सिंहासनावर बसलेली पितवर्णाची, पिवळी वस्त्रे व अलंकार धारण केलेली एकहाती शत्रूची जीभ व एक हाती गदा धारण केलेली असे या देवीचे स्वरूप आहे.एकदा सत्ययुगात सकल ब्रह्मांडात मोठे वादळ उत्पाद माजले तेव्हा हे आरिष्ठ थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी सौराष्ट्रातील हरित तीर्थाकाठी श्रीदेवीची उपासना केली असता श्रीविष्णूंच्या तप तेजातून चैत्रशुद्ध अष्टमीला या देवीची निर्मिती झाली. ही आठवी महाविद्या असून, मृत्युंजय हिचा सदाशिव आहे ही श्रीकुलातील देवता दक्षिणाम्नयापीठस्था आहे.बडवामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी या नावांनी ही देवी उपासली व ओळखली जाते. हिची द्विभुज व चतुर्भुज रूपात उपासना होते. हिच्या उपासनेने शत्रूच्या वाईट कृत्याचे अतिवृष्टी दुष्काळ, वात चक्र या गोष्टींचे हरण होते ही उत्पात कृती थांबतात वशीकरण रोग शांती चमत्कारिक सिद्दींचा लाभ होतो अशी श्रद्धा आहे. ही पूजा श्रीपूजक अजित ठाणेकर, श्रीनिवास जोशी, नितीन सांगवडेकर यांनी बांधली.
Navratri 2025: दुसऱ्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाई श्री बगला माता रूपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:05 IST