कोल्हापूर : जयपूर येथील बेहरोडखाना पोलीस ठाण्याचा लाॅकअप तोडून फरार झालेला व पाच लाखांचे बक्षीस असलेला मूळचा हरियाणाचा कुख्यात गुंड विक्रम ऊर्फ पपला गुर्जर यास शुक्रवारी मध्यरात्री जयपूर पोलिसांच्या विशेष पथकाने सरनोबतवाडीत अटक केली. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने या पथकाने केली. गुरुवारी मध्यरात्री राजस्थान पोलीस कारवाई करतानाची पपलाला चाहूल लागली. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला. इमारतीखाली दबा धरून बसलेल्या गुर्जर याला पोलिसांनी तेथेच जेरबंद केले.
त्याच्यासोबत राहणारी जीया शिकलगार नावाची महिलेलाही ताब्यात घेतले. दोघांना पकडल्यानंतर पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. तेथून त्यांची रवानगी राजस्थानला झाली. कुख्यात गुंड पपला याच्यावर हरियाणा, राजस्थान, पंजाबमध्ये अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याची टोळी असून, त्याला एका प्रकरणात जयपूर पोलिसांनी त्याला २०१७ मध्ये अटक केली होती. तुरुंगात बसून त्याने गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे त्याला ऑक्टोबर २०१९ च्या अखेरीस राजस्थान पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी बेहरोडखाना पोलीस ठाण्यात केली. कोठडीमध्ये असताना त्याच्या पंचवीसहून अधिक साथीदारांनी पोलीस ठाण्यावरच हल्ला करीत त्याला ७ सप्टेंबर २०१९ ला पळवून नेले होते. त्यानंतर तो फरार झाला. सध्या त्याचे कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथे वास्तव्य होते. ही खबर राजस्थान पोलिसांना लागली. त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून सरनोबतवाडीमध्ये पपला राहत होता त्या ठिकाणाची रेकी केली. अत्यंत घातकी समजला जाणारा हा गुंड असल्यामुळे राजस्थान पोलिसांनी विशेष प्रशिक्षित पोलीस पथकाला पाचारण केले. या पथकाचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त सिद्धांत शर्मा व पोलीस निरीक्षक जहीर अब्बास यांनी केले.
कोल्हापूर पोलिसांची मदत
या कारवाईच्या अखेरच्या क्षणी पपलाकडून दगा फटका होऊ नये, याकरिता राजस्थान पोलिसांनी कोल्हापूर पोलीस दलाची मदत घेतली. शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्यासह स्थानिक पथकाने गुरुवारी रात्रीपासून या परिसरात तळ ठोकला होता. पपलाला पकडण्यासाठी राजस्थान पोलिसांनी पकडून देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
फोटो : २९०१२०२१-कोल-पपला गुर्जर-आरोपी (गुगलवरून घेतला आहे)