प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:39 IST2025-10-11T17:38:43+5:302025-10-11T17:39:12+5:30
पिंपातील पाणीही दोन महिन्यांपूर्वीचे

प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा
कोल्हापूर : आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी नोटिसा काढल्या आहेत.
एरंडोली ता. मिरज या ठिकाणी उपसंचालकांनी भेट दिली, तेव्हा कॉन्फरन्स हॉल आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोलीत वैद्यकीय साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. हे साहित्य विनावापर असून फ्रीजमध्ये घरगुती साहित्य ठेवले होते. हेल्थ एटीएम मशिन वापरात नव्हते. हिरकणी कक्षातील बेडशीट बदलले नव्हते. १३ सप्टेंबरला भेट दिली असता तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्मिता आनंदराव पवार या अनुपस्थित होत्या. त्या एसएनएसपी बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. परंतु, बैठकीलाही त्या अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांनाही नोटीस काढण्यात आली. एकूणच जिल्ह्याच्या कारभारावर नियंत्रण नसल्याने नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळत नसल्याचे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
वाचा - सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आरोग्य स्थितीची गावपातळीवर नेमकी काय स्थिती आहे, त्याचा वेध घेणारी विशेष मालिका..
रत्नागिरी जिल्ह्यातील ६८ पैकी ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एप्रिल ते ऑगस्ट २०२५ पर्यंत एकही प्रसूती झालेली नाही. सर्वाधिक प्रसूती केवळ दोन झाल्या आहेत. याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनाही नोटीस काढण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .सई रूपेश धुरी यांनाही नोटीस काढण्यात आली आहे. फोंडा प्राथमिक केंद्रामध्ये असलेली अस्वच्छता, कमी प्रसूती, औषधांची नीट न केलेली मांडणी, अनुपस्थित कर्मचारी याबाबतही त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
पिंपातील पाणीही दोन महिन्यांपूर्वीचे
फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वॉश बेसिनच्या शेजारी जे पाण्याचे पिंप आहे. त्यातील पाणी दोन ते तीन महिन्यापूर्वीचे असल्याचे या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाकडे जाताना वीज नसणे, पाण्याच्या टाकीला झाकण नसणे याचाही उल्लेख नोटीसीमध्ये आहे.
कोल्हापूर येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यशाळेवेळी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी तीन जिल्ह्यांतील ग्रामीण आरोग्याबाबत आरोग्य मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी संबंधितांना नोटीस काढण्यात आल्या आहेत. - डॉ. दिलीप माने, उपसंचालक, आरोग्य मंडळ, कोल्हापूर