विद्यापीठात अभ्यागतांना महिनाभर नो पास, नो एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:55+5:302021-04-04T04:23:55+5:30

कोल्हापूर : अभ्यागतांना या महिनाअखेरपर्यंत विद्यापीठात कोणत्याही कामासाठी कार्यालयात भेटता येणार नाही. अगदीच गरजेचे असेल तर संबंधित विभागप्रमुखांनी ...

No pass, no entry for visitors to the university for a month | विद्यापीठात अभ्यागतांना महिनाभर नो पास, नो एन्ट्री

विद्यापीठात अभ्यागतांना महिनाभर नो पास, नो एन्ट्री

कोल्हापूर : अभ्यागतांना या महिनाअखेरपर्यंत विद्यापीठात कोणत्याही कामासाठी कार्यालयात भेटता येणार नाही. अगदीच गरजेचे असेल तर संबंधित विभागप्रमुखांनी विशेष पासची सोय उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनांचे परिपत्रक शनिवारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी जारी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक निर्बंधांच्या आदेशाचे पालन शिवाजी विद्यापीठाने सुरू केले आहे. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी रोटेशन व वर्क फ्रॉम होम यांचा अवलंब काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. अत्यावश्यक सेवा प्रदान करणारे विभाग पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. अन्य कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्या उपस्थितीबाबत संबंधित कार्यालय प्रमुख उपस्थितीबाबतचा अहवाल आस्थापना विभागास सादर करावा, असेही कुलगुरूंनी परिपत्रकात नमूद केले आहे.

दिव्यांग शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, सेवक यांना घरातूनच काम करण्याची सूट देण्यात आली आहे. त्यांनी तातडीच्या कामाची गैरसोय हाेऊ नये म्हणून मोबाइल, ई-मेल यांची माहिती कार्यालयात देऊन त्याप्रमाणे कामांचा निपटारा घरातूनच करायचा आहे. याशिवाय कार्यालयातील गर्भवती महिला, अवयव प्रत्यारोपण, थेरपीसह व्याधीग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांनाही घरातूनच काम करण्याची सवलत देण्यात आली आहे. पण, त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

नो मास्क, नो एन्ट्री या नियमाची काटेकाेर अंमलबजावणी आवश्यक आहे. कार्यालयात उपस्थितांना तोंडावर मास्क घालणे बंधनकारक आहे. सुरक्षारक्षकांनी ताप नसल्याची खात्री झाल्यावरच आत प्रवेश द्यायचा आहे. सॅनिटायझर प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर आणि आत ठेवून त्याचा वापर करणे सर्वांनाच बंधनकारक आहे.

Web Title: No pass, no entry for visitors to the university for a month