Kolhapur: हळद काढायला माहेरी आलेल्या नवविवाहितेवर अज्ञाताचा हल्ला, गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:11 IST2025-06-09T16:11:28+5:302025-06-09T16:11:47+5:30
तातडीने उपचारासाठी दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला

Kolhapur: हळद काढायला माहेरी आलेल्या नवविवाहितेवर अज्ञाताचा हल्ला, गंभीर जखमी
हलकर्णी : आठवडाभरापूर्वी लग्न होऊन हळद काढण्यासाठी माहेरी आलेल्या नवविवाहितेवर अज्ञाताने हल्ला करून तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार हलकर्णी येथे घडला. या घटनेत नीलावती रामचंद्र व्हसकोटी (वय २९) ही गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलावतीचे लग्न आठवडाभरापूर्वी झाले होते. ती हळद काढण्यासाठी माहेरी चंदनकुड (व्हसकोटी मळा) येथे शनिवारी आली होती. ती जेवणापूर्वी घरासमोर असलेल्या शौचालयाजवळ आली असता अज्ञाताने तिच्या डोक्यावर रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. तिच्या कानाजवळही इजा झाली आहे. नरेवाडी येथील संगोपन हॉस्पिटल येथे निलावती हिला तातडीने उपचारासाठी दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला.
निलावती व्हसकोटी हिने फिर्याद दिल्याने गडहिंग्लज पोलिसांत शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका हा प्रकार काय आहे, तसेच नवविवाहितेला अशा प्रकारे गंभीर जखमी करण्याचे काय कारण असावे, याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देसाई हे करत आहेत.