कागलमध्ये ‘राष्ट्रवादी’चा लाटणे मोर्चा

By Admin | Updated: July 7, 2015 01:22 IST2015-07-07T01:22:19+5:302015-07-07T01:22:19+5:30

संजय गांधी निराधार योजना : महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; लाभार्थ्यांना आॅगस्टपासून पेन्शन पूर्ववत मिळणार

NCP's Juggernaut Frontier Front in Kagal | कागलमध्ये ‘राष्ट्रवादी’चा लाटणे मोर्चा

कागलमध्ये ‘राष्ट्रवादी’चा लाटणे मोर्चा

कागल : संजय गांधी निराधार योजनेतील जवळपास साडेतीन हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांची मासिक पेन्शन बंद केल्याच्या निषेधार्थ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर भव्य लाटणे मोर्चा काढण्यात आला.
हजारो वयोवृद्ध, विधवा, अपंग महिलांचा सहभाग, घोषणाबाजी आणि एका महिलेने तहसील कार्यालयाच्या इमारतीसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान, तहसीलदार शांताराम सांगडे यांनी येत्या आॅगस्ट महिन्याच्या एक तारखेला या अपात्र लाभार्थ्यांना पूर्ववत पेन्शन देऊन त्यांची फेरचौकशी आणि सुनावणी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
येथील गैबी चौकातून लाटणे मोर्चास प्रारंभ झाला. शहराच्या मुख्य मार्गावरून बसस्थानक ते मुरगूड नाका मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसील कार्यालयाच्या गेटवर हा मोर्चा पोलिसांनी रोखला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांबद्दल जर शंका असेल, काय माहिती हवी असेल तर संबंधिताला लेखी कळवून त्याचे म्हणणे घेऊन सुनावणीनंतर त्याची पेन्शन बंद करता येते, असे शासनाचे परिपत्रक असताना अधिकाऱ्यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून साडेतीन हजार लाभार्थ्यांची पेन्शन बंद केली आहे. हा बेकायदेशीर निर्णय मागे घ्यावा, असा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, बंद केलेली पेन्शन पूर्ववत सुरू करावी. या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत कार्यालयासमोरून आम्ही उठणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
तहसीलदार सांगडे, पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून मोर्चाबाबत माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार पोलीस बंदोबस्तात मोर्चास सामोरे गेले. ते म्हणाले, राधानगरी तहसीलमार्फत सर्व्हे होऊन चौकशीअंती हे लाभार्थी अपात्र ठरविले आहेत. आम्ही फेरचौकशी करू. यावर आंदोलकांनी आधी पेन्शन वर्ग करा आणि मगच चौकशी सुरू करा, अशी भूमिका घेतली. अखेर २०१२च्या शासन परिपत्रकाचा संदर्भ घेत सुनावणी घेऊन कार्यवाही करण्याचे तसेच तत्पूर्वी ही बंद ठेवलेली पेन्शन सुरू करण्याचे लेखी पत्र देण्याचे तहसीलदारांनी कबूल केले. त्यानंतर आ. मुश्रीफ आणि प्रमुख कार्यकर्ते तहसील कार्यालयात गेले. पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले.यावेळी भय्या माने, शिवानंद माळी, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, वसुधा कुंभार, संजय हेगडे यांची भाषणे झाली. युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नविद मुश्रीफ, आशाकाकी माने, रमेश माळी, प्रकाश गाडेकर, रघुनाथ जकाते, नेताजी मोरे, प्रवीण भोसलेंनी मोर्चाचे नेतृत्व केले.
 

Web Title: NCP's Juggernaut Frontier Front in Kagal