कोल्हापूर जिल्हा बँकेचे सत्ताकारण: मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यास राष्ट्रवादीचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:07 IST2025-07-24T16:06:38+5:302025-07-24T16:07:06+5:30
'मुश्रीफ यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशात नावारूपास आली'

कोल्हापूर जिल्हा बँकेचे सत्ताकारण: मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यास राष्ट्रवादीचा विरोध
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशात नावारूपास आली. मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता राखला. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, राजीनाम्यास आमचा विरोध आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.
मंत्री मुश्रीफ यांनी सोमवारी रात्री सांगली येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या कार्यक्रमात आपण जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, बँकेच्या संचालक मंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा बँकेत झाली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर अध्यक्षस्थानी होते.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे नेतृत्व आहे. जिल्हा बँकेच्या कारभाराच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, दहा वर्षांपूर्वी बँकेवर प्रशासक होते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सत्ता आल्यानंतर त्यांनी शिस्तबद्ध काम करत बँकेला देशपातळीवर पोहोचवले. त्यांच्या नेतृत्वाची आम्हा संचालकांना गरज असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ देणार नाही.
यावेळी, ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळाेखे, शीतल फराकटे, अमरसिंह माने, बाळासाहेब देशमुख, नितीन दिंडे, आप्पासाहेब धनवडे, संभाजी पवार, संतोष धुमाळ, विकास पाटील, विनय पाटील आदी उपस्थित होते.