महापालिकेने टोचली २०५ जणांना कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:37+5:302021-01-20T04:25:37+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे मंगळवारी शहरातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या २०५ कोरोना योद्ध्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. ...

महापालिकेने टोचली २०५ जणांना कोरोनाची लस
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे मंगळवारी शहरातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या २०५ कोरोना योद्ध्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. रविवारी १८३ जणांना लस टोचण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्यांना लस टोचली त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत ११ हजार ११९ कोरोना योद्ध्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्यांना ही लस टोचली जाणार आहे, त्यामध्ये खासगी तसेच महानगरपालिका दवाखाने येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारी शहरातील पाच आरोग्य केंद्रांवर ही लस टोचण्यात आली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.
लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून ज्यांना लस टोचण्यात आली आहे, त्यांच्या चित्रफिती तयार करून त्या समाज माध्यमांवर टाकल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी, असे आवाहन या चित्रफितीतून केले जात आहे.