शेट्टींचा आतल्या दाराने युतीचा प्रयत्न, धैर्यशील माने यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 12:05 IST2024-03-09T12:04:06+5:302024-03-09T12:05:16+5:30
कोल्हापूर : शरद पवार यांचा स्पर्श झाला की, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना एकत्र कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. ...

शेट्टींचा आतल्या दाराने युतीचा प्रयत्न, धैर्यशील माने यांची टीका
कोल्हापूर : शरद पवार यांचा स्पर्श झाला की, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना एकत्र कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचा फटका राजू शेट्टी यांना गेल्या वेळी बसला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेट्टी यांनी आतल्या दाराने युती करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.
कोरोची, ता. हातकणंगले येथे ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार माने म्हणाले, शेट्टी ठाकरे यांना भेटण्यास गेले. यात आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे. त्यांची नेहमीच वाटचाल ही वेगवेगळी राहिली आहे. तुम्हीच मला पाठिंबा जाहीर करा म्हणजे मी तुमच्याकडे पाठिंबा मागितला असे वातावरण व्हायला नको यासाठी ते ठाकरे यांना भेटले. तो त्यांचा डाव होता.
उमेदवारांची नावे महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवतील. आम्ही नरेंद्र मोदी यांनी देशभरात आणि आम्ही मतदारसंघात केलेली विकासकामे याचा लेखाजोखा घेऊन जनतेसमोर जात आहोत, असेही खासदार माने यांनी सांगितले.