Kolhapur: आषाढ यात्रेसाठी सेवानिवृत्त पोलिसाकडून पैसे उकळले, इस्पुर्ली ठाण्याचे तिघे अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:17 IST2025-08-12T19:16:56+5:302025-08-12T19:17:16+5:30
पोलिस अधीक्षकांनी घेतले फैलावर

Kolhapur: आषाढ यात्रेसाठी सेवानिवृत्त पोलिसाकडून पैसे उकळले, इस्पुर्ली ठाण्याचे तिघे अडकले
कोल्हापूर/दिंडनेर्ली : आषाढ महिन्यात इस्पुर्ली पोलिस ठाण्याकडून झालेल्या जत्रेसाठी व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका निवृत्त पोलिसानेच ऑनलाइन पैसे दिल्याच्या स्क्रीन शॉटसह पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. याती गंभीर दखल घेऊन अधीक्षक योगेश कुमार यानी सोमवारी (दि. ११) इस्पुर्ली पोलिसांची झडती घेतली. लवकरच यातील तीन पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
आषाढ महिन्यात सर्व पोलिस ठाण्यांमध्ये जत्रेची लगबग असते. वर्गणी काढून ही जत्रा साजरी केली जाते. इस्पुर्ली ठाण्यातील काही पोलिसांनी जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांकडे जबरदस्तीने पैशांची मागणी केली. पोलिस ठाण्यातून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याचे परिसरात फार्महाऊस आहे. त्यांच्याकडून पाच हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले.
याबाबत तक्रार येताच पोलिसांनी करवीरचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. क्षीरसागर यांनी तीन पोलिसांसह प्रभारी अधिकाऱ्यांची चौकशी करून चौघांना सोमवारी अधीक्षकांसमोर उभे केले. अधीक्षकांनी प्रभारी अधिकाऱ्यांसह चौघांचीही कानउघडणी केली. प्रश्नांची सरबत्ती करून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी तिन्ही पोलिसांसह त्यांचे प्रभारी अधिकारी प्रचंड तणावात होते.
चुकीला माफी नाही
याबाबत विचारणा केली असता, दोषींवर कारवाई होणारच. मुद्दाम केलेल्या चुकीच्या कामाला माफी मिळणार नाही, असे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्पष्ट केले. व्यक्ती बदलण्यापेक्षा व्यक्तींमधील दोष सुधारण्यासाठी कारवाई केली जाते. चुका होऊ नयेत, याची खबरदारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई होणारच, असे त्यांनी सांगितले.