अलमट्टीप्रश्नी आज मुंबईत बैठक, महायुतीच्या १८ लोकप्रतिनिधींनाच निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:28 IST2025-05-21T13:28:10+5:302025-05-21T13:28:47+5:30

कोल्हा पूर : अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कोल्हा पूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जोरदार आवाज उठवला असला तरी बुधवारी ...

Meeting on Almatti issue in Mumbai today only 18 people representatives of Mahayuti invited | अलमट्टीप्रश्नी आज मुंबईत बैठक, महायुतीच्या १८ लोकप्रतिनिधींनाच निमंत्रण

अलमट्टीप्रश्नी आज मुंबईत बैठक, महायुतीच्या १८ लोकप्रतिनिधींनाच निमंत्रण

कोल्हापूर : अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जोरदार आवाज उठवला असला तरी बुधवारी याच प्रश्नासाठी सरकारने बोलवलेल्या बैठकीला केवळ महायुतीच्याच १८ आमदार-खासदारांना निमंत्रित केले आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापूर येत असल्याचा दावा दोन्ही जिल्ह्यांतील सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांकडून केला जात आहे. सध्या अलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. याला कडाडून विरोध करत शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिरोळजवळ आंदोलन केले होते. 

याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी मुंबईत मंत्रालयात दुपारी ३:३० वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीचे दोन खासदार, १६ आमदार, अलमट्टी उंचीवाढ विरोधी संघर्ष समितीसह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

अलमट्टीचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत असल्याने आपल्या सर्वांची यात एकजूट असावी, यासाठी आम्ही पुढाकार घेऊन सर्वपक्षीय मोट बांधली होती. मात्र, सरकारने आजच्या बैठकीला केवळ महायुतीच्याच लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. महाविकास आघाडीच्या एकाही लोकप्रतिनिधीला बोलवलेले नाही. सरकारला एकतर्फी निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ देत. -सतेज पाटील, गटनेते, विधान परिषद, काँग्रेस, आमदार 

Web Title: Meeting on Almatti issue in Mumbai today only 18 people representatives of Mahayuti invited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.