मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:06 IST2025-09-26T12:06:11+5:302025-09-26T12:06:27+5:30

२० हजारांच्या औषधांसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई

Medical driver sells intoxicating injections two arrested in Kolhapur | मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात दोघांना अटक 

मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात दोघांना अटक 

कोल्हापूर : नशेसाठी मेफेनटरमाइन सल्फेट या गुंगीकारक औषधांची विक्री करणारा मेडिकल चालक तेजस उदयकुमार महाजन (वय ३५, रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) आणि ते खरेदी करणारा विवेक शिवाजी पाटील (३०, रा. उचगाव) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २५) दुपारी शाहूपुरीतील निंबाळकर चौकाजवळ केली. अटकेतील दोघांकडून मेफेनटरमाइन सल्फेटच्या ७४ बाटल्यांसह दोन दुचाकी आणि दोन मोबाइल असा सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूपुरी येथील निंबाळकर चौकाजवळ एक व्यक्ती मेफेनटरमाइन सल्फेट या नशिल्या औषधांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने सापळा रचून मेडिकल चालक तेजस महाजन आणि औषधांचा खरेदीदार विवेक पाटील यांना अटक केली. त्यांच्याकडे नशिल्या औषधांच्या ७४ बाटल्या मिळाल्या. सुमारे २० हजार रुपये किमतीच्या बाटल्यांसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

२७० रुपयांच्या बाटलीची ४०० रुपयांना विक्री

मेफेनटरमाइन सल्फेटच्या एका बाटलीची किंमत २७० रुपये आहे. अटकेतील दोघांकडून त्याची ४०० रुपयांना विक्री केली जात होती. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मुंबईतील एका मित्राकडून औषधांचा साठा मागविल्याची माहिती महाजन याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Medical driver sells intoxicating injections two arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.