कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी अंकली ते चोकाकची मोजणी पूर्ण, आठवड्यात देणार अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:10 IST2026-01-07T13:10:02+5:302026-01-07T13:10:50+5:30
नागपूर-रत्नागिरी महामार्गांतर्गत कार्यवाही

संग्रहित छाया
कोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या चोकाक ते अंकली विभागाच्या भूसंपादनासाठी चारपट मोबदला देण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर अवघ्या सहा दिवसात नागपूर-रत्नागिरी महामार्गाअंतर्गत येणाऱ्या अंकली ते चोकाकपर्यंतच्या गटांची मोजणी पूर्ण झाली आहे. एकूण क्षेत्र, बाधित होणारे शेतकरी, खातेदार यांची सविस्तर माहिती असलेला अहवाल आठवड्याभरात सक्षम प्राधीकर, महामार्ग प्राधिकरण व भूसंपादन विभागाला दिला जाणार आहे. त्यानुसार आदेश होऊन बाधितांना नुकसानभरपाईची रक्कम दिली जाणार आहे.
नागपूर-रत्नागिरी महामार्गांतर्गत अंकली ते चोकाकपर्यंतच्या रस्त्यासाठीची अधिसूचना उशिरा निघाल्याने येथील बाधितांना फक्त २ पट मोबदला देण्याचा निर्णय झाला होता. त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. दोन वर्षाच्या लढ्यानंतर आठवड्यापूर्वी राज्य शासनाने चारपट नुकसान भरपाईचा निर्णय दिला. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निर्णय झाल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सहा दिवसात बाधित होणाऱ्या जमिनी मोजणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
या मोजणीसाठी हातकणंगलेमध्ये सात तर शिरोळमध्ये सात टीम करण्यात आल्या होत्या. या टीमने मोजणी पूर्ण केली असून या दोन्ही ठिकाणच्या कार्यालयात मोजणी अहवाल तयार केला जात आहे. त्यामध्ये बाधित होणारे क्षेत्र किती असेल याची नेमकी आकडेवारी समजेल. नकाशासह संयुक्त भूसंपादन मोजणी अहवाल यासह कृषी, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, स्वच्छता व पाणीपुरवठा अशा विविध विभागांचेही अहवाल तयार केले जातील. हे अहवाल भूसंपादन क्रमांक १२, महामार्ग प्राधिकरण यांना दिले जातील. सक्षम प्राधीकर यांच्यामार्फत आदेश होऊन बाधितांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल.
बाधित होणारे गट
- हातकणंगले : १८५ गट, तसेच ९० सिटी सर्व्हे नंबर
- शिरोळ : २६० गट, जैनापूर गावठाण परिसर
जिल्हाधिकारीसोा यांच्या आदेशानुसार कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी संपादित होणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. यासाठी शेतकरी, खातेदारांकडून पूर्ण सहकार्य मिळाले. आठवड्याभरात मोजणी अहवाल सक्षम प्राधीकर यांना सादर केला जाईल. - जयदीप शितोळे, उपअधीक्षक भूमिअभिलेख, हातकणंगले, शिरोळ