Kolhapur: निवडणूक खर्चासाठी १० लाख मागितल्यानेच विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:37 IST2025-11-24T17:34:59+5:302025-11-24T17:37:08+5:30
कौसर हिच्या माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका उपस्थित केल्याने दोन्ही कुटुंबात वाद झाला होता

Kolhapur: निवडणूक खर्चासाठी १० लाख मागितल्यानेच विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांना अटक
कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीच्या तगाद्यामुळेच विवाहितेने आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यावरून कुरुंदवाड शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय ३१) व जाऊ समिना इलहान गरगरे (वय २८, दोघेही रा. कुरुंदवाड) या दोघा आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील सासू मुमताज गरगरे व सासरा राजमहंमद गरगरे यांना अटक झाली नव्हती.
कौसर गरगरे हिने गुरुवारी (दि. २०) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सुरुवातीला टीईटीचा अभ्यास होत नसल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याचे वर्दीमध्ये नोंदविण्यात आले होते. मात्र, कौसर हिच्या माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका उपस्थित केल्याने दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. यावेळी घातपाताच्या संशयावरून मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका माहेरकडील लोकांनी घेतली होती.
दरम्यान, मृताचा भाऊ अलताफ आवटी (रा. जयसिंगपूर) याने पतीसह सासू, सासरा व जावेविरूद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. पतीच्या व्यवसायाकरिता व सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, अशा मागणीचा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून कौसरने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.