Kolhapur: विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ अटकेत, गुन्हा दाखल झाल्यापासून होता पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:38 IST2025-08-28T11:38:21+5:302025-08-28T11:38:46+5:30
शनिवारपर्यंत पोलिस कोठडी; शाहूवाडी पोलिसांची कारवाई

Kolhapur: विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ अटकेत, गुन्हा दाखल झाल्यापासून होता पसार
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याच्या कारणातून १४ जुलै २०२४ रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी हिंदू बांधव समितीचा प्रमुख रवींद्र पडवळ याला शाहूवाडी पोलिसांनी बुधवारी (दि. २७) अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. दंगलप्रकरणी पोलिसांनी ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी २४ जणांना यापूर्वीच अटक झाली होती.
विशाळगडावरील अतिक्रमणांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी १४ जुलै २०२४ रोजी कार्यकर्त्यांसह विशाळगडावर जाण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी पुण्यातील हिंदू बांधव समितीचा प्रमुख रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील सेवाव्रत प्रतिष्ठानचा बंडा साळोखे हे कार्यकर्त्यांसह विशाळगडावर पोहोचले होते. शेकडो कार्यकर्त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती.
त्याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी २४ जणांवर अटकेची कारवाई झाली होती. या गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ पसार झाला. तो पुण्यातील फुरसुंगी परिसरात असल्याची माहिती मिळताच शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा त्याला फुरसुंगी येथून ताब्यात घेतले. बुधवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करत जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
१३ महिने पसार
गुन्हा दाखल होताच पडवळ पसार झाला होता. पोलिसांच्या चार पथकांकडून त्याचा शोध सुरू होता, तरी तो त्यांच्या हाती लागला नव्हता. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी तो कणेरी मठावरील एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांसमोर तो कार्यक्रमात वावरत होता. तरीही त्याला अटक न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली होती. याच गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी बंडा साळोखे हादेखील पसार होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
अटक टाळण्यासाठी पडवळ पळून गेला होता. अखेर त्याला फुरसुंगी येथून अटक केली असून, सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून येणाऱ्या माहितीवरून तपास पुढे जाईल. - आप्पासो पवार, पोलिस उपअधीक्षक, शाहूवाडी उपविभाग