महायुतीचा जिल्हा परिषदेचा फॉर्म्युला आज ठरणार, मुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:57 IST2026-03-14T11:56:26+5:302026-03-14T11:57:33+5:30
अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खेचाखेची

महायुतीचा जिल्हा परिषदेचा फॉर्म्युला आज ठरणार, मुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार हे निश्चित असून आता उर्वरित फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी आज, शनिवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी (दि. १७) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडी होणार असल्याने आणि अधिवेशनासाठी नेते मुंबईला जाण्याची शक्यता असल्याने आजच याबाबतची चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारीला लागला. त्यानंतर सभापती निवडीही झाल्या. चार दिवसांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आली तरी महायुतीमधील पदांचे वाटप अजूनही झालेले नाही. अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खेचाखेची झाल्याचे चित्र असले तरी ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाला अध्यक्षपद हे सूत्र अखेर मान्य करण्यात आले आहे. त्यामुळेच आता उर्वरित चर्चेसाठी ही बैठक होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारीच कोल्हापुरात दाखल झाले आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक हे आज शनिवारी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यामुळेच आज बैठक घेवून त्यामध्ये किमान पदांचा फार्म्युला आणि अन्य बाबी ठरण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्या कागलमध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवाडे, यड्रावकर यांच्या विवाह समारंभानिमित्त उद्या, रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या लग्नानंतर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमासाठी वेळ दिला असून रविवारी संध्याकाळी कागलधील पाझर तलावावरील रेन डान्स फौंटनच्या लोकार्पणासाठी ते कागलमध्ये येणार आहेत. रविवारी गडबड होणार असल्याने आज शनिवारीच जिल्हा परिषद पदांच्याबाबतीत धोरण ठरण्याची शक्यता आहे.