जिल्ह्यातील १७ गावांत धावणार महारेशीम रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:34+5:302021-02-10T04:23:34+5:30
कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘महारेशीम अभियान’ घेण्यात आले आहे. मंगळवारपासून १५ ...

जिल्ह्यातील १७ गावांत धावणार महारेशीम रथ
कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘महारेशीम अभियान’ घेण्यात आले आहे. मंगळवारपासून १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १७ गावांत प्रबोधनाचा रथ धावणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रथाला हिरवा बावटा दाखवून अभियानाचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, रेशीम विकास अधिकारी संजय शिंदे, प्रकल्प अधिकारी बी. एम. खंडागळे, जिल्हा मनरेगा समन्वयक संजय पवार, तांत्रिक साहाय्यक तानाजी शिर्के, वाय. ए. पाटील, शेतकरी तानाजी पाटील उपस्थितीत हा अभियान उद्घाटन सोहळा झाला.
मंगळवारपासून सात दिवस हा रथ जिल्ह्यातील १७ गावांतून धावणार आहे. गडहिंग्लज, करवीर, हातकणंंगले असे तीन समूह तयार केले आहेत. प्रत्येक समूहात पाच ते सहा गावांचा समावेश करण्यात आला आहे. गडहिंग्लज समूहांतर्गत सरोळी, कुमरी, कानडेवाडी, कळीवडे, मुरकुटेवाडी; करवीर समूहांतर्गत म्हाळुंगी, कोतोली, पुनाळ, राधानगरी, कोथळी, पणोरी व हातकणंगले समूहांतर्गत यळगुड, लक्ष्मीवाडी, वाळवे खुर्द, सोनाळी, तळसंदे, व्हनाळी या गावांत फिरविण्यात येणार आहे.
ऑनलाईन नाेंदणी करणाऱ्यांनाच लाभ
हा रथ जाणाऱ्या मार्गावर जागेवरच ऑनलाईन नोंदणी होणार आहे. ऑनलाईन नोंदणी बंद होणार असल्याने लाभार्थ्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह नोंदणी करावी. अभियानाच्या कालावधीत नोंदणी करणाऱ्यांनाच २०२१-२२ या आर्थिक वर्षात मनरेगा योजनेअंतर्गत शासनाच्या निकषांनुसार पात्र राहतील. यासाठी समूहनिहाय, ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार केला आहे.
फोटो: ०९०२२०२१-कोल- रेशीम अभियान
फोटो ओळ : कोल्हापुरात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सात दिवस चालणाऱ्या महारेशीम अभियानाचा प्रारंभ रथाला हिरवा बावटा दाखवून केला.