Kolhapur- Gokul Dudh Sangh: संचालक पदाची खिरापत वाटून मते मिळत नाहीत, महादेवराव महाडिकांचा मंत्री मुश्रीफांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:02 IST2025-07-17T13:02:32+5:302025-07-17T13:02:58+5:30
मुश्रीफ यांनी बाहेर राहून ‘बिनविरोध’चे प्रयत्न करावेत

Kolhapur- Gokul Dudh Sangh: संचालक पदाची खिरापत वाटून मते मिळत नाहीत, महादेवराव महाडिकांचा मंत्री मुश्रीफांना टोला
कोल्हापूर : मोठा गाजावाजा करत पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत ‘गोकुळ’ची सत्ता घेतली. चार वर्षांत चांगला कारभार केल्याचा डांगाेरा पिटता तर मग तुम्हाला ‘टाेकन’ देण्याची वेळ का आली, असा सवाल करत मंत्री, आमदारांनी ‘टोकन’चा पाडलेला पायंडा चुकीचा असल्याची टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.
संचालकपदांची संख्या वाढविण्यामागे दूध उत्पादकांचे हित काय? संचालकपदाची खिरापत वाटून मते मिळत नसल्याचा टोलाही त्यांनी संघाचे व महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला.
महाडिक म्हणाले, कोणत्याही सहकारी संस्थेत विश्वासाने काम केले तर निवडणुकीत प्रलोभनाची गरज नसते. मात्र, ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘टोकन’ दिले जात आहे. त्यासाठी मंत्री, आमदार हे सुद्धा फिरत आहेत. जिल्ह्यातील दूध उत्पादक स्वाभिमानी आहे, तुम्ही चांगले काम केले तर तुमच्यासोबत तो डोळे झाकून राहतो.
राजकीय सोयीसाठी संचालकांची संख्या २५ करणे हे कितपत योग्य आहे. संचालकांचा खर्च वाढणार त्यामध्ये दूध उत्पादकांचा काय फायदा? दूध उत्पादकांच्या घामावर ‘गोकुळ’ मोठा झाला, त्याचे श्रेय कोणी घेऊ नये.
मुश्रीफ यांनी बाहेर राहून ‘बिनविरोध’चे प्रयत्न करावेत
केडीसीसी बँकेची निवडणूक वेगळी असते, त्या धर्तीवर कोणी प्रयत्न करणार असल्याचे समजते. त्यासाठी जागा वाढवण्याचा खटाटोप कोण करत असेल तर ते अशक्य आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रक्रियेत राहून बिनविरोध करता येणे शक्य नाही, त्यांनी बाहेर राहून हे प्रयत्न करावेत, असेही महाडिक यांनी सांगितले.
जाजम, घड्याळ खरेदीची निविदा काढली का?
हीरकमहोत्सवानिमित्त संघाने दूध संस्थांना जाजम व घड्याळ दिले. साडेचार कोटींची खरेदी करताना निविदा काढली का? एका दिवसात संबंधिताला पैसे दिल्याचा आरोप महाडिक यांनी केला.
महायुती म्हणून सोबत..
महायुती म्हणून सगळे एकत्र राहूया, पण प्रत्येक माणसाला स्वत:प्रमाणेच किंमत देत त्याचा मान राखला पाहिजे. त्याचे भानही सगळ्यांनी ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला.
‘आयकर’ परताव्याचे ३२ कोटी काय झाले?
आमच्या काळात आयकर विभागाने ३२ कोटींचा दंड केला होता. त्याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई सुरू केली होती. ती संघाच्या बाजूने झाली, संबंधित विभागाने संघाला ३२ कोटी रुपये दिले त्याचे काय झाले? गेल्या आर्थिक वर्षात १४२ काेटी ठेवी दाखविल्या वर्षभरात त्या ५१२ कोटींपर्यंत कशा पोहोचल्या? असा सवालही महाडिक यांनी केला.