Kolhapur: शेअर मार्केटमध्ये फसला अन् चोरीचा बनाव रचला; देणेकऱ्यांचा तगादा टाळण्यासाठी कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:11 IST2025-01-31T12:10:46+5:302025-01-31T12:11:10+5:30
कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान आणि उसने पैसे घेतलेल्या मित्रांकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाल्याने अमीर अब्दुलकादीर इनामदार (वय ...

Kolhapur: शेअर मार्केटमध्ये फसला अन् चोरीचा बनाव रचला; देणेकऱ्यांचा तगादा टाळण्यासाठी कृत्य
कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान आणि उसने पैसे घेतलेल्या मित्रांकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाल्याने अमीर अब्दुलकादीर इनामदार (वय २५, रा. आराम कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर) याने चोरीचा बनाव रचला. लक्ष्मीपुरीतील सुसर बागेजवळ लघुशंकेला गेल्यानंतर मोपेडची डिकी उचकटून २ लाख ३८ हजार रुपयांची रोकड अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद देण्यासाठी तो लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गेला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा बनाव उघडकीस आला. गुरुवारी (दि. ३०) दुपारी हा प्रकार घडला.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अमीर इनामदार हा तरुण पोलिस ठाण्यात आला. मोठ्याने रडत त्याने त्याची २ लाख ३८ हजारांची रोकड चोरीला गेल्याचे ठाणे अंमलदारांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड पथकासह लक्ष्मीपुरीतील सुसर बागेजवळ पोहोचले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञही घटनास्थळी पोहोचले.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात चोरीचा प्रकार कुठेच दिसला नाही. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात पोहोचून अमीर इनामदार याच्याकडे चौकशी केली. विसंगत उत्तरांमुळे त्याचा बनाव उघडकीस आला. पोलिसांची दिशाभूल करून खोटी फिर्याद देण्यासाठी आल्याबद्दल पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
शेअर मार्केटमध्ये नुकसान
एमबीएची पदवी घेतलेला इनामदार हा गेल्या चार वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत होता. यात त्याला ६७ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. उपअधीक्षक टिके यांनी त्याचे शेअर मार्केटचे खाते तपासताच बनाव उघडकीस आला. हातउसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी तगादा वाढत होता. तगादा टाळण्यासाठी चोरीचा बनाव केल्याची कबुली त्याने दिली.