विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी रात्री उशिरापर्यंत जात पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:59+5:302021-01-20T04:25:59+5:30
कोल्हापूर : येथील जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाने ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवले होते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सध्या रात्री ...

विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी रात्री उशिरापर्यंत जात पडताळणी
कोल्हापूर : येथील जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाने ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवले होते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सध्या रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज सुरू आहे. शैक्षणिक कारणाने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांपैकी मंगळवारअखेर १२१४ प्रमाणपत्रांची निर्गत झाल्याची माहिती सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी सचिन साळे यांनी दिली.
हे कार्यालय कधी वेळेत पडताळणी करून देत नाही अशाच कायम तक्रारी असतात व आजपर्यंतचा अनुभवही तसाच आहे; परंतु त्याला छेद देणारे काम सध्या सुरू आहे. महाविद्यालयीच्या प्राचार्यांना ३० ऑक्टोबर २०१९ रोजी पत्र पाठवून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु, काही विद्यार्थ्यांकडून उशिरा प्रस्ताव दाखल झाले होते. ऑक्टोबर महिन्यात ३३६, नोव्हेंबर महिन्यात ३२६, डिसेंबर महिन्यात १२११ आणि जानेवारीमध्ये आजअखेर ३०९ असे एकूण २१८२ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी १२१४ निर्गत झाले आहेत. अवघ्या दहा दिवसांत जवळपास ६०० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर सकाळी ९ रात्री ९.३० वाजेपर्यंत कामकाज सुरू असून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काम सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही उमेदवारांच्या सोयीसाठी २२ ते ३० डिसेंबर या सुट्टीच्या कालावधीत कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. सुमारे ३ हजार ५०० प्रस्ताव निवडणूक कालावधीत दाखल झाले असून लवकरच मूळ कागदपत्रासह छाननीसाठी संबंधितांना बोलावण्यात येणार असल्याचे साळे यांनी सांगितले.