बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:30+5:302020-12-09T04:20:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बचत गटाच्या महिलांनी कोरोनाच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातून निधी एकत्रित करून शासनाला दिला आहे. महिलांनी ...

बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बचत गटाच्या महिलांनी कोरोनाच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातून निधी एकत्रित करून शासनाला दिला आहे. महिलांनी कर्ज घेऊन उद्योग-व्यवसाय उभारावेत यासाठी आयसीआयसीआय व सारस्वत बँक यांच्यामार्फत बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करू दिले आहे, असे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ऑनलाईन पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने, रिजनल रिसोर्स पर्सन विलास बच्चे, जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, संचालक अनिल तराळ, ऑनलाईन पोर्टलचे योगेश भट, अमित पाटील, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक विक्रम परीट उपस्थित होते. यावेळी संयुक्त देयता समूह यांना मंजुरीपत्र व ज्या बचत गटांना जास्त लिंकेज केले आहे, त्यांना धनादेश वाटप करण्यात आले .
ठाकरे यांनी कोडोलीमधील रामकृष्ण ॲग्रो व्हेजिटेबल आणि फूड प्रॉडक्टस यांना भेट दिली. महिला कुटुंब व ग्रामविकास लोकसंचलित साधन केंद्रातील आळते गावातील श्रीगणेश स्वयंसाहाय्यता महिला बचत गटांनी सुरू केलेल्या बेकारी व्यवसायास भेट दिली. यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी झिंजाडे म्हणाले, कोल्हापूरमध्ये सद्य:स्थितीत माविमअंतर्गत १०८ गावांत, एक महानगरपालिका व नऊ नगरपरिषदांमध्ये तीन हजार ८८६ बचत गटाच्या माध्यमातून ५६ हजार ६३० महिलांचे संघटन करण्यात आले आहे. तीन हजार ५४० बचत गटांना आजअखेर ३१५ कोटी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात ९२५ बचत गटांना २३.८० कोटी बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला कुटुंब व ग्रामविकास लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष रेखा दावणे यांनी आभार मानले.
---
इंदुमती गणेश