के.पी. यांच्यामुळेच ‘बिद्री’ची स्थिती भक्कम

By Admin | Updated: September 5, 2016 00:39 IST2016-09-05T00:39:01+5:302016-09-05T00:39:01+5:30

हसन मुश्रीफ : मुदाळ येथे मेळावा; आगामी निवडणुकीत त्यांची आघाडी विजयी होईल

K.P. Because of this, Bidri's condition is strong | के.पी. यांच्यामुळेच ‘बिद्री’ची स्थिती भक्कम

के.पी. यांच्यामुळेच ‘बिद्री’ची स्थिती भक्कम

सरवडे : बिद्री साखर कारखान्यात माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कारभारामुळेच आजची आर्थिक स्थिती भक्कम आहे. विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते टीका करत आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी १५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मुदाळ येथील स्वामी हुतात्मा वारके सूतगिरण येथे मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘बिद्री’ची प्रगती ही दहा वर्षांच्या आर्थिक कारभाराची पुंजी आहे. के. पी. पाटील यांच्या अभ्यासू व कठोर निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. के.पीं.च्या नेतृत्वाखालील आघाडी सभासदांच्या विश्वासामुळे १५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल. या विजयात महत्त्वाची भूमिका ही वाढीव होणारे व त्यामध्ये न होणारे सभासदच बजावणार आहेत.
वाढीव सभासद अपात्र झाल्यानंतर विरोधक मंडळींनी साखर-पेढे वाटले. मात्र, त्यांची बाजू ऐकून कागदपत्रे तपासण्यास सहकार कलम ११ खाली चौकशी करण्यात आम्ही यशस्वी झालो. तरीही ते आमच्यासारखा निकाल लागला म्हणतात आणि विजयाचा दावा करतात. चांगल्या कारभारावरही टीका करतात. यापूर्वी सहवीज प्रकल्पावरही खोटे आरोप केले. आता सर्वजण म्हणतात, प्रकल्प चांगला आहे. त्यामुळे विरोधकांची डोकी फिरलीत काय हे तपासायला पाहिजे.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम ठेवत सहवीज प्रकल्पही यशस्वीपणे सुरू आहे. सभासदांना न्याय मिळवून देण्यात दिल्लीपर्यंत लढाई केली व यशस्वी झालो. मात्र, विरोधक आपण यशस्वी झाल्याचा डांगोरा पिटत आहेत. यावेळी देवराज बारदेस्कर, भीमराव पोवार, प्रकाश पाटील यांची भाषणे झाली.
मेळाव्यास ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सुनीलराज सूर्यवंशी, ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे, माजी संचालक फिरोजखान पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, संघाचे अध्यक्ष बाळ देसाई,
सुनील कांबळे, जि. प. माजी सदस्य राजेंद्र पाटील, दत्तामामा खराडे, वसंत पाटील, धनाजीराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
‘दादा’ बदली करतील
बिद्री साखर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांकडून बँकेच्या बोर्ड मिटिंगमध्ये मिळते. वाढीव ३00 रुपये देण्यात ‘बिद्री’ सक्षम आहे. मात्र, अधिकारी बोलले आणि ते कळाले तर ‘दादा’ त्यांची बदली करतील, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आ. मुश्रीफ यांनी लगावला.
 

 

Web Title: K.P. Because of this, Bidri's condition is strong