Kolhapur ZP Election 2026: भुदरगडला आघाडीचा बार फुसका, शिंदेसेनेची मुसंडी लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:53 IST2026-02-12T16:53:11+5:302026-02-12T16:53:51+5:30
आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात युतीने राष्ट्रवादीच्या ताब्यातील जागा हिसकावून घेतली. हा के. पी. पाटील गटासाठी चिंतनाचा मुद्दा

Kolhapur ZP Election 2026: भुदरगडला आघाडीचा बार फुसका, शिंदेसेनेची मुसंडी लक्षवेधी
शिवाजी सावंत
गारगोटी : भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि निर्णायक ताकद असलेल्या काँग्रेसची साथ असूनही आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. निकालाने दोन्ही पक्षांना आत्मचिंतनाची वेळ आणली, तर शिंदेसेनेने सामान्य कार्यकर्त्यांना संधी देत मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली.
तालुक्यात कोणत्याही एकाच पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवण्याइतकी ताकद नाही, हे राजकीय वास्तव आहे. दोन गट एकत्र आल्याशिवाय सत्तेचा मार्ग खुला होत नाही हे ओळखून माजी आमदार के. पी. पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना सोबत घेत ‘शिवशाहू विकास आघाडी’उभी केली. काही महिन्यांपूर्वीच उद्धव सेनेची मशाल खाली ठेवून अजित पवार यांचे घड्याळ हातात बांधलेल्या के. पी. पाटील यांच्या या राजकीय खेळीने सुरुवातीला वातावरण आपल्या बाजूला झुकवले.
राज्यातील महायुती तालुक्यातही व्हावी, अशी चर्चा रंगली होती. मंत्री प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र, जागावाटपातील अडचणींमुळे ही महायुती आकाराला आली नाही. त्याचा थेट परिणाम आघाडीच्या गणितावर झाला. जिल्हा परिषद निवडणुकीत चारपैकी तीन सदस्य काँग्रेसचे असल्याने गारगोटी व कडगाव या जागा काँग्रेसला, तर आकुर्डे व पिंपळगाव राष्ट्रवादीला देण्यात आल्या.
वाचा: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही पंधरा महिन्यांचे?, प्राथमिक चर्चेची उद्या शक्यता
पंचायत समितीत अनुक्रमे तीन व पाच जागांचे वाटप झाले. कागदावर मजबूत दिसणारी ही आघाडी प्रत्यक्षात मात्र विस्कटलेली दिसली. उमेदवारीत नाराजी निर्माण झाली. माजी पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आघाडीला धक्का दिला. गारगोटी गटात आघाडी मजबूत दिसत असतानाही मताधिक्य समाधानकारक नव्हते.
मडिलगे गणात राष्ट्रवादी-काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांच्या गावातून युतीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य अनेक शंका उपस्थित करणारे ठरले. स्थानिक पातळीवर ‘आतील संधान’ झाल्याची चर्चा रंगली. आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात युतीने राष्ट्रवादीच्या ताब्यातील जागा हिसकावून घेतली. हा के. पी. पाटील गटासाठी चिंतनाचा मुद्दा आहे.