'कोल्हापूर-पुणे वंदे भारत' आज सुरु; आसन क्षमता, थांबे अन् वेळापत्रक.. जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:03 IST2024-09-16T13:03:21+5:302024-09-16T13:03:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईनने उद्घाटन करणार, रेल्वे राज्यमंत्र्यांची उपस्थिती

'कोल्हापूर-पुणे वंदे भारत' आज सुरु; आसन क्षमता, थांबे अन् वेळापत्रक.. जाणून घ्या सविस्तर
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. या रेल्वेला आज, सोमवारी दुपारी ३ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना हे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
खासदार महाडिक म्हणाले, वंदे भारत आता कोल्हापूर ते पुणेपर्यंत धावत असली तरी लवकरच मुंबईपर्यंत सुरू केली जाईल. करवीरवासीयांनी उपस्थित राहावे. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे, रूपाराणी निकम आदी उपस्थित होते.
अशी धावणार ‘वंदे भारत’...
- 'वंदे भारत’ एक्स्प्रेस रेल्वे सोमवार, गुरुवार व शनिवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापुरातून सुटेल व दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुणे स्थानकावर पोहोचेल.
- प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पुण्याहून सुटणारी ही रेल्वे सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात येणार आहे.
येथे असेल थांबे..
मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा आहे.
अशी आहे आसन क्षमता..
- एकूण डबे : ८ (त्यात ७ चेअर कार व एक एक्झिक्युटिव्ह क्लास)
- पाच डब्यात : प्रत्येक ७८ आसन
- रेल्वे इंजिन जवळच्या दोन्ही डब्यात : प्रत्येक ४४ आसन
- एक्झिक्युटिव्ह क्लास : ५२ आसन
- एकूण आसन क्षमता : ५३० प्रवासी
- तिकीट दर : प्रतिव्यक्ती ५६० रुपये व एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११३५ रुपये
- सोयी : तिकीट दरातच मिळणार चहा, जेवण, पाणी