(केवळ कोल्हापूरसाठी) राज्याला मिळणार नवे २८९२ आरोग्य अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:37+5:302020-12-09T04:20:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २८९२ ...

(केवळ कोल्हापूरसाठी) राज्याला मिळणार नवे २८९२ आरोग्य अधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या सर्वांची आता राज्यातील १५ हून अधिक जिल्ह्यांत आरोग्य उपकेंद्रांवर नियुक्ती करण्यात येणार आहेत. यासाठी येणाऱ्या आठवड्यात नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३८० जणांना सोमवारी नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. १५ जिल्ह्यांमधील याबाबतची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी तीन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आली. सुरुवातीला बहुपर्यायी प्रश्न, नंतर सहा महिन्यांचे नाशिक येथे प्रशिक्षण आणि नंतर लेखी परीक्षा हे तीन टप्पे होते. या अंतिम लेखी परीक्षेसाठी राज्यातील ३०५१ उमेदवार बसले होते. त्यातील २८९२ जण उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्वांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून गुणवत्तेनुसार त्यांची समुपदेश तत्त्वानुसार उपकेंद्रांवर नियुक्ती करायची आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. फाळके, आशा कुडचे, डॉ. स्मिता खंदारे, नामदेव मोरे, डॉ. फारूक देसाई यांनी समुपदेशन प्रक्रिया राबवून संबंधितांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. संबंधितांना १० डिसेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकट
तीन वर्षे सेवा न केल्यास १ लाख रुपये दंड
या उमेदवारांना सहा महिने नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यादरम्यान त्यांना प्रतिमहिना १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेनुसार नियुक्ती झाल्यानंतर कराराप्रमाणे जर जिल्ह्यात ३ वर्षे सेवा केली नाही तर अशा आरोग्य अधिकाऱ्यांना १ लाख ३ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे, तसे करारनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
चौकट
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकावार उपलब्ध होणारे अधिकारी
आजरा २४, भुदरगड २८, चंदगड ७, गडहिंग्लज ३३, गगनबावडा ९, हातकणंगले४६, कागल ३४, करवीर ५०, पन्हाळा ४०,राधानगरी ३८, शाहूवाडी ३८,शिरोळ ३३
चौकट
चंदगडला जाण्यासाठी कुणीच तयार नाही
चंदगड तालुक्यात ३३ आरोग्य उपकेंद्रे असताना तिकडे मात्र जाण्यासाठी कोणीही तयार नसल्याचे चित्र समुपदेशनादरम्यान दिसून आले. या तालुक्यात केवळ ७ अधिकारी हजर राहणार असून उर्वरित २६ उपकेंद्रांना हे अधिकारी तूर्त तरी उपलब्ध होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.