कोल्हापूर बाजार समितीच्या ‘हुशारी’ने व्यापाऱ्यांच्या ‘बनवेगिरी’ला चाप, कर्नाटकातील ३० टन गूळ पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:24 IST2025-07-26T19:23:35+5:302025-07-26T19:24:08+5:30
साडेतीन लाखांचा दंड वसूल

कोल्हापूर बाजार समितीच्या ‘हुशारी’ने व्यापाऱ्यांच्या ‘बनवेगिरी’ला चाप, कर्नाटकातील ३० टन गूळ पकडला
कोल्हापूर : शाहू मार्केट यार्ड येथील पत्त्यावर महालिंगपूर (कर्नाटक) येथील गूळ गुजरातला पाठवण्यात येणारा ३० टन गुळाचा ट्रक कोल्हापूर बाजार समिती प्रशासनाने पकडला. संबंधित व्यापाऱ्यांकडून साडेतीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. दोनच दिवसांपूर्वी साडेतीन कोटींचा काजू पकडला होता. त्यापाठोपाठ दुसरी कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर गुळाच्या नावाखाली कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गूळ गुजरातला पाठवला जातो. अशा तक्रारी अनेक वर्षे सुरू आहेत. महालिंगपूर येथून ३० टन गूळ भरलेला ट्रक गुरुवारी रात्री बाजार समितीच्या आवारात लावला होता. समितीच्या सुरक्षा रक्षकांच्या तपासणीत अधिक चौकशी करता, हे प्रकरण उघडकीस आले.
समितीचे परवानाधारक जे. के. ट्रेडर्सचा हा गूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांना बोलावले. या गुळाचा सेस ३५ हजार होतो; पण समितीच्या कायद्यानुसार दहा पट म्हणजेच साडेतीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. यावेळी सभापती सूर्यकांत पाटील यांच्यासह संचालक नाना कांबळे, दिलीप पोवार, सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील, विभागप्रमुख अनिल पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
सापडला म्हणून चोर..
संबंधित व्यापाऱ्याच्या गाडीवर स्थानिक चालक असल्याने त्याने गुरुवारी रात्री समिती आवारात आणून ट्रक लावला, म्हणूनच हे उघडकीस आले; पण राजरोसपणे कर्नाटकातील गूळ येथील परवानाधारक व्यापारी गुजरातसह इतर ठिकाणी पाठवतात, त्याला चाप लावण्याचे आव्हान समितीला आहे.
सभापतींची धास्ती..
सभापती सूर्यकांत पाटील यांची निवड होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले आहेत. त्यांनी आल्या बरोबर सेस चुकवणाऱ्याविरोधात मोहीम उघडली आहे. सेस चुकवणारी यंत्रणा येथे कार्यरत असून या यंत्रणेने आता सभापतींची धास्ती घेतली आहे.
समितीकडून सोयी-सुविधांची अपेक्षा करायची आणि सेस चुकवायचा हे चालणार नाही. यापुढे केवळ दंड वसूल करून थांबणार नाही, कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करू. - सूर्यकांत पाटील (सभापती, बाजार समिती)