आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:39 IST2025-10-30T12:38:10+5:302025-10-30T12:39:14+5:30
Kolhapur Crime News : दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरातील वडणगे रस्त्यावर काही तरुणांनी कोयते नाचवत दहशत पसरवली होती. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News : काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे रस्त्यावर काही तरुणांनी कोयते नाचवत दहशत माजवली होती. रस्त्यावरुन जाणारी वाहने थांबवत त्या तरुणांनी हातात कोयते नाचवले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, यानंतर अनेकांनी या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आता कोल्हापूरपोलिसांनी तरुणांनी ज्या ठिकाणी कोयते नाचवले होते त्याच ठिकाणी त्यांना गुडघ्यावर बसवले.
दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांना गुडघ्यावर बसवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. कोयता नाचवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करवीर पोलिसांनी दखल घेत ही कारवाई केली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी एका महिलेला मारहाण झाली होती. याच तरुणांनी ही मारहाण केल्याचे समोर आले. या महिलेने करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. यानंतर उत्कर्ष सचिन जाधव, अभिषेक उर्फ अभ्या विनय पिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. हर्षवर्धन शरद सुतार, अनुराग उर्फ टेड्या जयसिंग निमन आणि प्रथमेश भीमराव कांबळे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
महिलेसोबत वाद झाला होता
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उत्कर्षचा महिलेसोबत वाद झाला होता. ही महिला मंगळवारी सायंकाळी मित्रासोबत पन्हाळा रोडवर चिखली फाटानजीक एका हॉटेलजवळ थांबली होती. यावेळी उत्कर्ष आणि अभिषेक या दोघांनी कस्तुरीच्या मित्रावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मित्र जखमी झाला. यानंतर इतर तिघांनी रस्त्यावर कोयता नाचवत दहशत निर्माण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करवीर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना दणका दिला. पोलिसांनी त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला.