Kolhapur Byelection: करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त, पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची कोर्टात मागणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 02:05 PM2022-04-16T14:05:57+5:302022-04-16T14:33:13+5:30

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी व्यतिरीक्त इतर पक्ष आणि अपक्ष असे तेरा उमेदवार रिंगणात होते.

Kolhapur Byelection: Karuna Munde's deposit confiscated, by-elections will be demanded again | Kolhapur Byelection: करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त, पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची कोर्टात मागणी करणार

Kolhapur Byelection: करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त, पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची कोर्टात मागणी करणार

Next

कोल्हापूर/मुंबई - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. येथील मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. अखेर, 18 हजारांहून अधिक मतं घेऊन त्या विजयी झाल्या आहेत. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर राहिले. करूणा मुंडे यांनीही या निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. मात्र, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. करुणा मुंडेंना निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील दुपारी 2 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 103 मतं मिळाली होती. अखेर, त्यांना केवळ 133 मतं मिळाली आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी व्यतिरीक्त इतर पक्ष आणि अपक्ष असे तेरा उमेदवार रिंगणात होते. राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाम आणि प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. करूणा मुंडे यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. मात्र, ही लढत प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात झाली. करुणा मुंडेवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. त्यांना किती मतं मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होत्या. २६ व्या फेरीनंतर करुणा मुंडेंना एकूण १३३ मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे मुंडपेंक्षा अधिक मतं नोटाला मिळाली. नोटाचा पर्याय एकूण १ हजार ७८८ जणांनी निवडला.

निवडणूक निकालानंतर करुणा मुंडे यांनी निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला. तसेच, ही निवडणूक रद्द करण्यात यावी, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही करुणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ''ही मतमोजणी रद्द करुन निवडणूकच रद्द करण्यात यायला हवी होती. पण, तरीही मतमोजणी सुरु आहे, याचा मी विरोध करते. याविरोधात मी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणार आहे, ही लोकशाही आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे", असे करुणा शर्मांनी म्हटले आहे.

आचारसंहितेचं उल्लंघन, पैसे वाटपही झालं

"कोल्हापूर उत्तरमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन झालं असून 10 तारखेलाच इथं आचारसंहिता संपली होती. तरीही काँग्रेस आणि भाजपनं आपापल्या मोठ्या वर्तमानपत्रात जाहिरात आणि प्रचाराच्या बातम्या दिल्या आहेत. त्यामुळं आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे. त्याचबरोबर या पक्षांचे लोक इथं पैसे वाटताना पकडले गेले आहेत. याशिवाय इथं काँग्रेस आणि भाजपकडून 40 लाखांहून अधिक खर्चही झाला आहे. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही, असे करुणा शर्मा यांनी म्हटलंय.

मी निवडणुकीतून खूप काही शिकले

मुंबईला गेल्यानंतर हायकोर्टात मी रिट पिटिशन दाखल करणार आहे. या निवडणुकीत माझा आधीच विजय झाला आहे. मला राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी या निवडणुकीची मदत झाली हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला मतं जरी कमी असली तरी मला या निवडणुकीत बरचं काही शिकायला मिळालं आहे. यासाठी मी देवाचे आभार मानते. मी हारुनही जिंकणारी बाजीगर आहे, असंही पुढे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीने उधळला गुलाल

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २६ व्या फेरी अखेर ९६ हजार २२६ मतं तर भाजपाचे सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. जवळपास १८ हजारांहून अधिक मताधिक्यांनी काँग्रेसचा विजय झाला आहे. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापूरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला. कोल्हापूर उत्तरची जागा राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते.
 

 

Web Title: Kolhapur Byelection: Karuna Munde's deposit confiscated, by-elections will be demanded again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.