खंडणी गुन्ह्यातील कोल्हापुरातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे निलंबित, पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:21 IST2025-10-06T12:20:29+5:302025-10-06T12:21:03+5:30
अकलूज पोलिसांकडून शोध सुरू

खंडणी गुन्ह्यातील कोल्हापुरातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे निलंबित, पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई
कोल्हापूर : अकलूज (जि. सोलापूर) येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवरील मोक्काची कारवाई रद्द करण्याचे आमिष दाखवून ६५ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीतील सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे (पोलिस मुख्यालय, कोल्हापूर) याचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी कारवाईचा आदेश काढला. कारवाईची चाहूल लागताच तो वैद्यकीय रजा घेऊन पसार झाला आहे. अकलूज पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे आलेला मोक्का कारवाईचा प्रस्ताव रद्द करण्याचे आमिष दाखवून हुपरी येथील समीर पानारी याने अकलूजमधील तरुणाकडे ६५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. गुन्हा दाखल होताच अकलूज पोलिसांनी पानारी याला अटक करून अधिक चौकशी केली असता, कोल्हापुरातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे याच्यासह आणखी तिघांची नावे निष्पन्न झाली.
खंडणी प्रकरणात थेट एका पोलिसाचा सहभाग असल्याचे समजताच विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कठोर कारवाई करण्याचा आदेश अकलूज पोलिसांना दिला होता. कारवाईची चाहूल लागताच सहायक फौजदार नलावडे रजा टाकून पळाला. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. अकलूज पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून, अद्याप तो सापडलेला नाही.
पाच जणांवर गुन्हा
या गुन्ह्यात समीर अब्बास पानारी (३५, रा. महावीर नगर, हुपरी, ता. हातकणंगले), सतीश रामदास सावंत (५०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर), सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे (पोलिस मुख्यालय, कोल्हापूर), कमलेश रमेश कानडे (रा. लालबाग, मुंबई) आणि लाला ऊर्फ लालासाहेब ज्ञानेश्वर अडगळे (रा. अकलूज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील समीर पानारी आणि लाला ऊर्फ लालासाहेब अडगळे या दोघांना अटक झाली आहे.